वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेले असते. वादविवादात साधक-बाधक गोष्टींची पर्वा करत नाहीत. अगदी स्पष्टवक्ते असतात. अनेकदा ते फारच कटू बोलतात. विनोदप्रिय असूनही स्वभाव वादग्रस्त असतो. भांडण झाल्यास स्वतःच्या नुकसानीचीदेखील काळजी करत नाहीत. आपलेच बोलणे पुढे रेटतात.
वृश्चिक राशीचे लोक निर्भय असतात : कालपुरुषाच्या कुंडलीत वृश्चिक राशी आठव्या भावात येते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक स्वतः घाबरत तर नाहीच पण आपल्या कृतीतून दुसऱ्यांना घाबरवायचे काम जरूर करतात. त्यांच्या अनिश्चित स्वभावाची, वागण्या बोलण्याची आणि कामाच्या पद्धतीची इतरांना नेहमी भीती वाटते.
खूप सावध असतात : या राशीचे लोक सर्वच बाबतीत सावध असतात. कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्या अंगाशी गोष्टी येणार नाहीत ना, याची पूर्ण काळजी घेतात. आले अंगावर घे शिंगावर अशीही त्यांची वृत्ती असते. मात्र कधी कधी तसे करण्याच्या नादात ते आपली विश्वासार्हता गमावून बसतात.
कटू बोलण्याने समोरच्याला दुखावतात : वृश्चिक अर्थात विंचू. विंचू ज्याप्रमाणे डंख मारतो, तसे या राशीचे लोक रागाच्या भरात समोरच्याच्या वर्मावर घाव घालायला कमी करत नाहीत. कोणाला काय वाटेल याचा विचारही करत नाहीत. कधी कधी ते एवढे कठोर होतात की आपल्या कृतीपेक्षा आपल्या नुसत्या बोलण्याने देखील समोरच्याला दुखावतात. मात्र ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल एक अपशब्दही ऐकून घेत नाहीत.
बदला घेण्यासाठी नेहमी तयार : हे लोक डोक्याने तापट तर असतातच, पण दीर्घकाळ मनात वैर ठेवतात. एवढेच नाही तर कोणी त्यांच्याशी वाईट वागले तर ते आठवणीने त्याचा बदला देखील घेतात. मग ती व्यक्ती त्यांच्यासाठी कितीही जिवलग असो, ते बोलून परतफेड केल्यावरच शांत होतात. वृश्चिक राशीची व्यक्ती इतर राशींवर वर्चस्व गाजवते. दुसऱ्यांचे दोष शोधायची त्यांना प्रचंड हौस असते. एवढे दोष असूनही कामाच्या बाबतीत म्हणाल तर ते प्रचंड मेहनती असतात. त्यांना लोकसंग्रह आवडतो. ते जिथे जातील तिथे मित्र जोडतात.
गूढ विषयांमध्ये रस : वृश्चिक राशीच्या लोकांनी वृषभ राशीचा जोडीदार निवडल्यास त्यांचा परस्पर समन्वय चांगला राहतो. सूर्य, गुरू आणि चंद्र त्यांना अनुकूल परिणाम देतात तर बुध, शुक्र आणि शनि या राशीचे शत्रू मानले जातात. या लोकांना गूढ विद्येत, गूढ विषयात अधिक रस असतो. तसेच ज्योतिष शिकण्यातही त्यांचा कल दिसून येतो.
दृढ निश्चयी असतात : हे लोक त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. ते सहजासहजी विचलित होत नाहीत. त्यांना आपल्या गोष्टी जरा तिखट मीठ लावून सांगायला आवडतात. पण दुसऱ्याने केलेली फसवणूक त्यांना सहन होत नाही. अशा लोकांनी डोकं शांत ठेवण्यासाठी पोवळे धारण करावे. तसेच हनुमंताची उपासना करावी. यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले तर त्यांचा उत्कर्ष नक्कीच होऊ शकतो.