3 Auspicious Vrat Yog on Second Shravan Shukrawar 2024: व्रत-वैकल्यांचा, सण-उत्सवांची रेलचेल असलेला चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे. दररोज वेगवेगळी व्रते आणि त्या व्रतांचे अनन्य साधारण महत्त्व असे या श्रावण मासाचे महात्म्य आहे. रविवार ते शनिवार या दिवसांत साजरी केली जाणारी व्रत-वैकल्ये अनेकार्थाने विशेष आहेत. प्राचीन काळापासून अव्याहतपणे सुरू असलेली ही व्रत-वैकल्ये भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहेत. सन २०२४ चा श्रावण मास सुरू आहे आणि १६ ऑगस्ट रोजी दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी ३ व्रतांचा महासंयोग जुळून आल्याचे सांगितले जात आहे.
दुसरा श्रावणी शुक्रवार १६ ऑगस्ट २०२४ रोजी आहे. या दिवशी दर शुक्रवारी केले जाणारे जरा-जिवंतिका व्रत म्हणजेच जिवतीची पूजा आहे. तसेच श्रावणातील दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे. याशिवाय श्रावण शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत आहे. म्हणजेच श्रीविष्णू, वरदलक्ष्मी आणि जिवती पूजनाचे शुभ पुण्य फल प्राप्त होऊ शकते. लक्ष्मी नारायणाचे विशेष शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. धन-धान्य, सुख-समृद्धी वैभव प्राप्त करून देणारी ही व्रते आणि त्याचे महत्त्व वेगळे असल्याची मान्यता असल्याचे सांगितले जाते.
श्रावणी शुक्रवार: जिवतीसह करा वरदलक्ष्मी व्रत; जाणून घ्या, महात्म्य, व्रतकथा अन् आरती
श्रावण पुत्रदा एकादशी व्रत
प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्रीविष्णूंचे पूजन आराधना, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते. अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात. श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील पुत्रदा एकादशीचे महत्त्व वेगळे असल्याचे सांगितले जाते. या दिवशी श्रीविष्णूंचे आवाहन करून षोडषोपचार पूजा करावी. श्रीविष्णूंची आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. विष्णू सहस्रनाम म्हणणे शक्य नसेल तर श्रवण करावे.
दुसरा श्रावणी शुक्रवार: जिवतीची पूजा कशी करावी? आईने मुलांसाठी करायचे व्रत; पाहा, महत्त्व
श्रावण वरदलक्ष्मी व्रत
वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळण्यासाठी केले जाते, अशी मान्यता आहे. सध्याच्या काळात केवळ रोगमुक्तीसाठी असे व्रत आचरले जातेच, असे नाही. तरीही व्रताचरणाच्या परंपरेत खंड पडू नये, यासाठी अनेक ठिकाणी हे व्रत एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक केले जाते. या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते. देवीला सुंदर साडी नेसवली जाते. अलंकार, दागिने, कमरपट्टा, हार, नथ यांचा शृंगार केला जातो. गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे वरदलक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते. देवादिकांनी आणि ऋषिमुनिंनी 'श्री वरदलक्ष्मी' म्हणून तिची स्तुती केली आहे. वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची देवता मानली गेली आहे.
श्रावण शुक्रवारी पुत्रदा एकादशी: ‘असे’ करा व्रत; सांगता कशी कराल? पाहा, शुभ मुहूर्त, मान्यता
जरा-जिवंतिका जिवतीची पूजा
श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जिवतीचे चित्र लावून गंध, हळदकुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात. किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला लावलेल्या जिवतीचा कागद समोर ठेवून त्यातील जिवतीची पूजा केली जाते. जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात. घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण केले जाते. ‘हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर’, अशी प्रार्थना केली जाते. जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. त्या दिवशी देवीची ओटी भरावी, असे सांगितले जाते.