गजानन महाराजांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी भरलेले आहे.
एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम भरून दिली आणि विस्तव आणण्यास म्हणून बंकटलालने त्यांना गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले. सोन्याचांदीचा त्याचा मोठा धंदा होता. नळी फुंकीत तो बसला होता. मुलांनी त्याच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला. विस्तव देत नाही, असे त्याने मुलांना स्पष्ट सांगितले आणि महाराजांची त्याने निंदा केली. मुलांना त्याने घालवून दिले. मुले रिकामी परत आली. सोनार विस्तव देत नाही असे म्हणाली. तेव्हा महाराज म्हणाले, `अरे चिलमीवर काडी धरा, विस्तव येईल.' बंकटलालने महाराजांच्या चिलमीवर काडी धरताच चिलमित तात्काळ विस्तव पेटला. महाराजांच्या मुखातून धूर निघाला.
इकडे जानकीराम सोनाराच्या घरी पितृ श्राद्धाचे जेवणकरी जेवावयास बसले होते. त्यांना चिंचवणे वाढताना त्या वाढप्यांना किडे दिसले. त्यांनी ते चिंचवणे जानकीरामाला दाखवले. त्याला कोडे उलगडले. गजनान राजेश्वर चिंतामणीला मी भिकारी मानले, त्यांना वेडा ठरवले त्याचेच मला हे प्रायश्चित्त मिळाले. जानकीराम बंकटलालच्या घरी गेला. भीत भीत त्याने महाराजांना दंडवत घातले. `दयाघना, तुला माझी करुणा येवो. मी अपराधी आहे, मला क्षमा कर. तू साक्षात उमानाथ आहेस. शेगावी नांदत आहेस. देवा तू अनाथांचा वाली आहेस.' असे जानकीरामाने उद्गार काढले. त्याची ही दीनवाणी ऐवूâन, त्याला पश्चात्ताप झाला. महाराज म्हणाले, `जानकीराम, तू घरी सुखाने जा. चिंचवणे पंगतीला वाढ. त्यात कीडे नाहीत.' जानकीराम घरी आला. चिंचवणे पाहू लागला. त्यात त्याला काहीच आढळले नाही. ते शुद्ध, स्वच्छ दिसले. पंगतीत बसलेल्या सर्वांना महाराजांचे महत्त्व कळले.
शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)
चंद्रमुकीन हा शेगावचा गजानन माराजांचा निस्सीम भक्त होता. महाराजांच्या सभोवती भक्त मंडळी जमली होती. कोणी महाराजांच्या गळ्यात हार घालत होते, कुणी खडीसाखर वाटत होते, कुणी पंख्याने वारा घालीत होते. कुणी आंबे कापून फोडी हातात देत होते. महाराज चंद्रमुकीनला म्हणाले, `चंदू, तू घरी जाऊन दोन कान्होले आण. नवीन काही करू नको. कोठे शेजारी मागू नको. कोठे दुसरीकडे पाहू नको. उतरंडीत आहेत ते, आण जा!
चंद्रमुकीन घरी गेला. पत्नीला सांगू लागला. `महिन्यापूर्वी कान्होले केले होते. महाराजांसाठी दोन काढून ठेवले होते.' असे म्हणून त्याची पत्नी उतरंडीत पाहू लाली. तिला त्यात एका बाजूस ठेवलेली पुडी दिसली. एक महिना झाला. नासून गेले असतील म्हणून तिने पुडी सोडून पाहिली. कान्होले जसेच्या तसे होते. चंद्रमुकीन याने ते घेतले व महाराजांना आणून दिले. महाराजांना संतोष वाटला. एक त्यांनी स्वत: खाल्ला, दुसरा प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिला. महाराजांची त्या सर्वांवर कृपादृष्टी झाली. अशीच कृपादृष्टी आपणा सर्वांवर होवो म्हणून महाराजांनी दिलेला मंत्र म्हणा... गण गण गणात बोते!