ईश्वरभक्त आपण असतोच, पण त्याबरोबरच आपण या समाजाचे, देशाचे देणे लागतो. त्यांच्याप्रती आपण आपली कर्तव्य पूर्ती करणे तेवढेच महत्त्वाचे असते. म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिहितात, ''देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो! हे लक्षात ठेवून केलेली समाजसेवा, देशसेवा म्हणजे खरी देशभक्ती!
असेच तीन देशभक्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव, ऐन तारुण्यात आपल्या हसत हसत शहीद झाले. त्यांना जी फाशी झाली ती कायदेमंडळात बॉंब फेकला म्हणून नाही, तर सौंडर्सच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना फाशी देण्यात आली. ही हत्या १७ डिसेंबर, १९२८ रोजी झाली होती. त्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याच्या अखेरीस २३ मार्च, १९३१ रोजी फासावर लटकविण्यात आले. हे बलिदान देऊन ते अमर झाले.
माता आणि माती यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. मात्र आपण या दोन्हीच्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. एक जन्म देते, तर दुसरी आपला सांभाळ करते. एकीच्या उदरात आपला जन्म झाला तर एकीत आपण मिसळणार आहोत. हे भान ठेवून या दोन्ही मातांची सेवा आपल्या आयुष्यात केलीच पाहिजे. क्रांतिकारकांनी प्रचंड लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले आता आपली जबाबदारी आहे ते ते टिकवून ठेवण्याची! त्यामुळे अशा क्रांतिकारकांच्या शहिद दिनानिमित्त त्यांचे स्मरण केले पाहिजे आणि त्यांचा आदर्श ठेवून आपणही धर्मकार्यात, देवकार्यात तसेच देशकार्यात आपले सक्रिय योगदान दिले पाहिजे!
जय हिंद!