>> रवींद्र गाडगीळ
कटी तट पीत दुकूल विचित्र मयूख तिरस्कृत चंड रुचे, प्रणत सुरासुर मौलि मणि स्फुर दंशूक सन्नख चंद्र रुचे | जित कनकाचल मौलि मदोर्जित गर्जित कुंजर कुंभ रुचे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१६||
तू परिधान केलेली जी सुंदर पिवळी रेशमी साडी आहे, तिच्या रंगासमोर सूर्याचे तेजहि फिके पडत आहे, तुझ्या चरणाशी लीन झालेल्या देवदेवतांच्या मुकूटमण्यांचे तेज तुझ्या सर्वांगावर असे शोभायमान आभा निर्माण करत आहे की, जसे सुमेरु पर्वतावरील मदोन्मत्त हत्तींच्या गंडस्थळातून तेजस्वी मद ओघळून ते तेज चमकत आहे. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.
विजित सहस्त्र करैक सहस्त्र करैक सहस्त्र करैक नुते, कृत सुर तारक संगर तारक संगर तारक सूनुनुते | सुरथ समाधी समान समाधी समान समाधी सुजाप्य रते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१७||
सहस्त्र बाहू तारकासुर राक्षसाला मारुन समस्त देवतांना तारणारा तारक, सहस्त्र नक्षत्रांनाही लाजवणारा, तुझा सुंदर शिवपुत्र कार्तिकेय, जो तुझ्या पराक्रमापुढे नतमस्तक होतो, सप्तशती पाठात दिलेल्या सुरथ नावाच्या राजाची व समाधी नावाच्या वैश्य साधूची संसारव्यथेची चिंता एकच असून त्यांनी जी समाधी लावून तुझे चिंतन केले व तू त्यांच्यावर कृपावंत होऊन जे समाधान दिलेस, म्हणून हे महिषासुरमर्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.
पदकमलं करुणा निलये, वरीवस्यती योsनुदिनं सुशीवे, अयी कमले कमलानिलये कमलानिलय: सकथं न भवेत | तव पदमेव परं पद्मस्वीती शीलयतो मम कीं न शिवे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||१८||
हे कमलिनी, कमलासिनी, करूणामयी, कल्याणमयी पार्वती, जो तुझी रोज पूजा, पाठ, चिंतन, जप, सेवा करतो तो तुझ्याचसारखा कमलालय (लक्ष्मीचे भंडार) होत असेल, मी तर अशीच इच्छा सतत मनात धरून असतो की तुझे पद हेच सर्वश्रेष्ठ पद आहे. जगात तू असल्याशिवाय कोणालाच काडीची किंमत नाही, जोवरी आहे पैसा, लोक म्हणतील जवळ बैसा बैसा! तूच आमचे कल्याण करणार आहेस. म्हणून हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.
हे शाकंभरी देवी, आमच्यावर कृपावंत हो आणि हा जागतिक स्तरावरचा कोरोना नामक आजार दूर कर, ही तुझ्याच चरणी प्रार्थना. आम्ही प्रत्येक जीव जगवू, जगू देऊ, त्यांना अभय देऊ. आम्हाला नेहमी निरोगी ठेवणारा आयुष्यभर शाकाहार करीत राहू. पुढील श्लोक उद्या.