>> रवींद्र गाडगीळ
स्तुतिमित स्तिमित: सुसमाधीना नियमतोsयमतोsनुदिनं पठेत | परमया रमया स निषेव्यते परिजनोsरिजनोsपि च तं भजेत ||२२||
हे माते, जो कोणी तुझा भक्त हे स्तोत्र नित्यनेमाने शांत चित्ताने, भक्तीने, एकाग्रतेने, यम नियमांचे पालन करून, संयम पाळून, निरपेक्षपणे ध्यानस्थ होऊन वाचेल, मनन करेल, चिंतन करेल, त्याला तू नक्कीच त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्तच, आनंद, सुख, शांति, समाधान करणार्या गोष्टी उपलब्ध करून देशील यात शंकाच नाही. शेवटी मानवाची इच्छा ती काय असणार कंचन आणि कांचन. तीच इंद्राप्रमाणे भोग मिळावेत अशी सामान्य माणसांची इच्छा असते. जी तू पुरी करतेस. परंतु असामान्य माणसे मात्र तुझी कृपा त्यांना तुझ्या चरणसेवेची इच्छा असते ती मात्र तू दे, हीच प्रार्थना. ज्यामुळे परके व आपले सगळेच त्याच्यावर नितांत प्रेम करायला लागतील.
रामायती किलकर्षस्तेषु चित्त नराणाम वरज ईव यासमाद्रामकृष्ण: कविनाम | अकृत सुकृतिगम्य रम्य पद्यैक हर्म्यम, स्तवनमवनहेतुं प्रीतये विश्वमातू: ||२३||
बालकाचे बोबडे बोल हे सर्वांनाच गोड व ऐकावेसे वाटतात. म्हणून मी हे महिषासुरमार्दिनी, विश्वमाता पार्वती, तुला प्रसन्न करण्यासाठी हे काव्य रचले आहे, हे तू गोड मानून घेशील व तुझ्या भक्तांना ही गाविशी वाटेल अशी मी आशा करतो आणि त्यासाठी तुझा आम्हा सर्वांना आशीर्वाद अपेक्षितो.
इंदूरभ्यो मुहूर्विंदूरम्यो यत: सोsनवद्य: स्मृत:, श्रीपते: सूनुनाकारितो योsधुना विश्वमातू: पदे पद्यपुष्पांजली: ||२४||
आवडलीना ही जगदंबास्तुति? जिच्यात इंदु (शिव) पासून बिन्दु (शिवा) पर्यन्त सर्वांची दखल घेतली आहे. सर्व देवदेवतांची, सज्जनांची स्तुति करण्यात आल्यामुळे ती दोषमुक्त व निर्दोष झाली आहे. हे पद्य तुझ्या चरणावर अर्पण आहे, तू त्याचा स्वीकार कर. म्हणून हे महिषासुरमर्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जय जयकार असो.
अशा रीतीने आई जगदंबे शाकाहारी माते, या शाकंभारी नवरात्रोत्सव निमित्त तुझे हे पद्यगान आम्ही करू शकलो,तुझी कृपा आमचे सर्वांवर कायम राहो. नावाप्रमाणे आम्हीही तुझी सेवा यच्चयावत जीवांना अभय देऊन शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करू. जीवांना मारून त्यांचा तळतळाट घेऊन आम्ही आमच्या जिभेचे चोचले पुरवणार नाही आणि अनासाये होणारे प्रदूषण वाचवू, कोणालाही दूषण न देता, सर्वांना विश्वास वाटेल असेच आमचे आचरण राहील. नुकताच अति मासाहारांमुळे घडलेला जगभरावर आलेले नैसर्गिक संकटातून आम्ही बाहेर आलेलो आहोत. त्यामुळे हयातून धडा घेऊन जे पचेल, रुचेल, जचेल तेच आम्ही करू. आमचे पोशिंदे तुझ्याच प्रमाणे असलेले शेतकरी, प्राणी, पक्षी, कीटक, सैनिक, रक्षक, पोलिस, सफाई कामगार, डॉक्टर, नर्स, वॉर्डबोय, शिक्षक, आईवडील, समाज, या सर्वांचा मान राखून आमची वर्तणूक ठेवू व राष्ट्राचा, कुटुंबाचा, समाजाचा, धर्माचा विकास साधू, फक्त तुझी कृपा हवी.
या देवी सर्वभुतेषु शाक रूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ।।