हिंदू धर्मात पूजेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्याही देवतेच्या पूजेचे पूर्ण फळ तेव्हाच मिळते जेव्हा त्यांची यथासांग पूजा केली जाते. त्याचप्रमाणे जर तुम्ही घरामध्ये शाळीग्राम पूजत असाल, तर त्याचे काही नियम जाणून घेणे खूप गरजेचे आहे.
शाळीग्राम हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. काळ्या रंगाच्या गोल गुळगुळीत दगडाला शाळीग्राम म्हणतात. ते तुळशी दलावर ठेवले जातात. असे म्हणतात, की भगवान शाळीग्रामची पूजा करताना अनवधानाने काही चुका झाल्या तर भगवान विष्णूंसोबतच लक्ष्मी मातेचीही नाराजी सहन करावी लागते. यासाठीच शाळीग्राम पूजनाचे नियम जाणून घेऊया.
शालिग्रामची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा
>>शाळीग्राम हा स्वयंभू विष्णू आहे असे शास्त्रात मानले जाते. जर तुम्ही घरात शाळीग्रामची स्थापना केली असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात तणाव निर्माण होऊ शकतो.
>>शाळीग्रामच्या पूजेत चुकूनही अक्षता वापरू नका. अक्षता म्हणजे तांदूळ. त्या वाहायच्याच असतील तर त्याला हळद लावलेली असावी, पांढरे तांदूळ अर्पण करू नये.
>>धर्मशास्त्रानुसार, शाळीग्राममध्ये अपार ऊर्जा असते. शाळीग्राम घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र पूजेच्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर घरावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर होतो. मतभेद वाढू लागतात. आणि कुटुंबावर कर्जाचा डोंगर चढू लागतो.
>>ज्यांच्या देवघरात शाळीग्राम असेल त्यांनी देवघरात शाळीग्राम ठेवण्यासाठी स्वतंत्र आसन ठेवावे. त्यावर तुळशीची पाने अंथरावीत. वर शाळीग्राम ठेवावा आणि तुळशीची पाने वहावीत. शाळीग्रामची नित्य पूजा करावी.
>>शाळीग्राम बाजारातून विकत आणू नये.संत महंत, गुरु, संन्याशी यांनी दिलेला शाळिग्रामच देवघरात ठेवावा. किंवा वंश परंपरेने आपल्या घराण्यात शाळिग्रामची पूजा होत असेल तरच तो हस्तांतरित करून पुढच्या पिढीकडे द्यावा.
>>काही कारणाने शाळीग्राम विसर्जित करण्याची वेळ आली तर त्याची शास्त्रशुद्ध पूजा, अभिषेक करून मगच भगवान महाविष्णूंची माफी मागून स्वच्छ वाहत्या नदीत तो विसर्जित करावा.