शनि जयंती दरवर्षी वैशाख अमावास्येला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येला झाला होता, म्हणून दरवर्षी शनि जयंती वैशाख महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. शनी देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यात यंदा ३० मे रोजी अर्थात शनी जयंतीच्या दिवशी सर्व सिद्धी योग जुळून आल्यामुळे य दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
शनि जयंतीचा विशेष सिद्धी योग :३० मे रोजी पहाटेपासून सर्वार्थ सिद्धी योग आहे, शनिदेवाच्या पूजेच्या दिवशी अभिजित मुहूर्तही आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा उपासनेच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानला जातो. शनि जयंतीच्या दिवशी सकाळी ७.१२ वाजल्यापासून सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर राहील. त्याचबरोबर सकाळपासून ११.३९ मिनिटांपर्यंत सुकर्म योग तयार होत आहे. तसेच या दिवशी सोमवती अमावस्यादेखील आहे. त्यामुळे आपल्या आध्यात्मिक उद्धाराच्या दृष्टीने भाविकांसाठी हा दिवस अत्यंत अनुकूल ठरणारा आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. चांगले कर्म करणाऱ्यांवर शनिदेवाची कृपा कायम राहते. शनिदेव हे न्याय्य देव असले तरी याउलट शनिदेव वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा देतात. शनीच्या राशी प्रवेशाने सदर राशीच्या जातकाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. त्याची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून विशेष उपाय सांगितले जातात, ते उपाय पुढीलप्रमाणे-
शनि जयंतीला करा हे उपाय :
- शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिदेवाच्या मंत्राचा जप 'ओम शनिश्चराय नमः' करा.
- शनि जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला तांब्याभर पाणी घाला.
- शनिदोषाच्या शांतीसाठी दररोज महामृत्युंजय मंत्र किंवा 'ओम नमः शिवाय' चा जप करा.
- यासोबतच सुंदरकांडाचे पठण केल्यास शनिदेवाची कृपा कायम राहते.
- शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकाने उपवास केला पाहिजे.
- शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हनुमंताची पूजा करण्याचाही प्रघात आहे.
- शनि जयंतीला शनिपूजेनंतर उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ, काळे हरभरे या काळ्या वस्तूंचे दान करा.
- शनि जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने घरातील संकटातून शांती मिळेल आणि व्यवसायात वृद्धी होईल.