शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. तो माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार शुभ-अशुभ फळ देतो. हेच कारण आहे की, लोक शनिदेवाला घाबरतात आणि त्याचे आशीर्वाद मिळविण्यासाठी विविध उपाय करतात. शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र मानले जातात. वैशाख आमावस्या या तिथीला त्यांचा जन्म झाला असे मानले जाते. यामुळे लोक या दिवशी विशेष पूजा करतात. यंदा शनि जयंती शुक्रवार, १९ मे २०२३ रोजी साजरी केली जाईल.
तिथि : या वेळी अमावस्या तिथी १८ मे रोजी रात्री ९.४२ मिनिटांनी सुरू होत असून ती १९ मे रोजी रात्री ९.२२ वाजता संपेल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार १९ मे रोजी असल्याने त्या दिवशी शनि जयंती साजरी केली जाणार आहे.
शुभ योग : शनि जयंतीच्या दिवशी शोभन योग तयार होणार आहे. या दिवशी शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत विराजमान होणार असल्याने षष्ठ योग तयार होत आहे. याशिवाय या दिवशी चंद्र आणि गुरू मेष राशीत असल्याने गजकेसरी योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत शनि जयंतीचा दिवस खूप खास आणि महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शनिदेवाची उपासना केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात.
पूजा पद्धत : शनि जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार व्हा. यानंतर शनिदेवाच्या मूर्तीवर तेल, फुलांची माळ आणि प्रसाद अर्पण करून त्याच्या चरणी काळे उडीद आणि तीळ अर्पण करा. यानंतर तेलाचा दिवा लावून शनि चालिसाचे पठण करावे. शनि जयंतीला गरजूंना अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते.
मंत्र जप : शनि जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पश्चिम दिशेला दिवा लावून 'ओम शम अभयहस्ताय नमः' या मंत्राचा जप करावा. याशिवाय 'ओम शं शनैश्चराय नमः' मंत्राचा ११ वेळा पुनरोच्चार करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांवर आशीर्वाद देतात.