ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचे चलन, गोचर यामुळे अनेक गोष्टींसह मानवी जीवनावर परिणाम होतो, असे मानले जाते. नवग्रहांमध्ये सर्वांत मंद गतीने चालणारा ग्रह म्हणजे शनी. शनीदेव प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे फल देतो, असे सांगितले जाते. शनी ज्या राशीत विराजमान असतो, त्याच्या आधी आणि नंतरच्या राशीच्या व्यक्तींना साडेसाती असते. अनेक जण साडेसाती किंवा शनीदेवाला संकट म्हणून पाहतात. मात्र, असे अजिबात नाही. काही मतांनुसार, साडेसाती ही शुद्धीकरण प्रक्रिया असते. (Shani Dev Shasha Yoga)
प्रत्येकाच्या जन्मकुंडलीत किंवा राशीचक्रात शनीचे स्थान वेगवेगळ्या ठिकाणी असते. असे अनेक शनी योग जुळून येऊ शकतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सुखी, संपन्न आणि धनवान बनण्यापासून कुणी रोखू शकत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शनी मकर, कुंभ किंवा तूळ राशीच्या केंद्र स्थानी स्थित असेल आणि लग्न स्थानी बलवान होत असेल, तर शनीचा शश नामक योग जुळून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनीदेव पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या स्थानी आपल्या स्व-राशीत म्हणजेच स्वतःचे स्वामित्व असलेल्या मकर किंवा कुंभ राशीत विराजमान असतील, तर पंचमहापुरुष योगात शुभ योग जुळून येतो. या योगाला शश योग म्हटले जाते. हा एक प्रकारचा राजयोग मानला जातो. (Shani Dev in Janam Kundali)
शश योगाचा काय प्रभाव पडू शकतो?
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत किंवा राशीचक्रात शश योग जुळून आला असेल, अशा व्यक्ती परोपकारी, योग्य सल्ला देणारा, मार्गदर्शन करणारा असू शकतो. गावातील प्रमुख व्यक्ती बनू शकतो, धनवान, सुख-समृद्धीने युक्त तसेच मान-सन्मान मिळणारी व्यक्ती असू शकते. शनीदेव एखाद्या कुंडलीत उच्च स्थानी असतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनात आनंद योग बनवतात. यामुळे त्या व्यक्तीला केवळ आनंदाची प्राप्ती होत नाही, तर आनंद द्विगुणित होतो. रोजगार, व्यापार, उद्योग, व्यवसाय, कार्यक्षेत्र यांमध्ये यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात. तसेच समाजात मान-सन्मान वृद्धिंगत होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. राजकीय क्षेत्रात या व्यक्ती नवी उंची गाठू शकतात. या व्यक्तींना पर्यटनाची आवड असते तसेच या व्यक्ती दीर्घायुषी असू शकतात, असे सांगितले जाते.
कर्मानुसार फल देणारा शनीदेव
काहींच्या मतांनुसार शनी कष्टकारी, दुःखदायक ग्रह असल्याचे मानले जाते. मात्र, शनीदेव कर्मानुसार फलप्रदान करतात, असाही एक मतप्रवाह आहे. मनुष्य जन्मात जे काही कर्म करतो, त्यानुसार साडेसाती असो, महादशा असो, अंतर्दशा असो किंवा ढिय्या प्रभाव असो, शनीदेव त्या त्या प्रमाणे फळ देतो, अशी मान्यता आहे. एखाद्या व्यक्तीने त्याचे कर्म चांगले ठेवले, तर शनीदेव सर्वश्रेष्ठ फल देतो. मात्र, व्यक्तीने याउलट आपले कर्म ठेवले, तर त्याला शनीदेवाचे फलही तसेच मिळते. शश नामक योगात व्यक्तीने कर्मे चांगली ठेवलीत, तर ती व्यक्ती प्रतिष्ठित, धनवान बनू शकते, अशी मान्यता आहे.
शुभ योग कधी जुळून येतो?
शनी तूळ राशीत विराजमान असेल, तेव्हा हा शुभ योग जुळून येतो. त्याची फळेही शुभ मिळतात. तूळ ही शनीची उच्च रास मानली जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत असा योग जुळून येत असेल, तर एखाद्या गरीब घरात जन्मूनही ती व्यक्ती तिच्या कर्माने आणि परिश्रमाच्या जोरावर श्रीमंत बनू शकते. मेष, वृषभ, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक मकर किंवा कुंभ लग्न स्थान असलेल्या व्यक्तींच्या कुंडलीत हा योग जुळून येऊ शकतो. तुमच्या कुंडलीत असा योग जुळून येत नसला, तरी काळजीचे कारण नाही. तुमची रास तूळ किंवा वृश्चिक राशीचा असेल, तरी शनीदेव राजयोगाप्रमाणे फल देतात, असे म्हटले जाते. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु किंवा मीन राशीच्या प्रथम स्थानी असेल, तर अशा व्यक्तींनाही शनीदेव धनवान बनवू शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.