नवग्रहांमध्ये शनिदेव यांच्याबद्दल सर्वांनाच धाक वाटतो. कारण त्यांना न्यायाची देवता म्हटले जाते. ते ज्यांच्या राशीला येतात किंवा ज्यांच्यावर त्यांची वक्र दृष्टी पडते त्यांच्यासाठी तो परीक्षेचा काळ असतो. मात्र ती परीक्षा मनुष्याच्या विकासासाठीच असते. परंतु तो कालावधी मनुष्याच्या संयमाचा कस लावणारा ठरतो. अशा वेळी शनी देवाची कृपा प्राप्त व्हावी म्हणून अनेक भक्त शनी देवाची उपासना करतात, शनी मंदिरात जातात. शनी देवस्थानाला भेट देतात. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे शनी शिंगणापूर. या क्षेत्राचा महिमा आपल्याला माहीत आहेच, त्याचा इतिहासही जाणून घेऊया.
शनी देवाची शिळारुपी मूर्ती :
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे देवस्थान आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी नाव जोडले गेले. हे एक तीर्थक्षेत्र मानले जात असून तिथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. शनैश्वराची पाषाण मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. एका रात्री शनिदेवाने एका गावकऱ्याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकऱ्यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला.
शनी देवाच्या चौथऱ्याला छप्पर नाही:
शनी देवाची शिळा एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाऱ्याला नवस पूर्तीचा अनुभव आला त्यामुळे त्याने शिळेभोवती चौथरा बांधला मात्र मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते, असे गावकऱ्यांनी निरीक्षण नोंदवले आहे. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही.
शनी शिंगणापुरात चोरी न होण्याचे कारण:
या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचिलित आहेत. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्या भीतीने तिथे चोरी होत नाही, असे म्हटले जाते. त्यामुळे तेथील गावातील घरांना कुलपे नाहीत की दारेही नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीचे रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केलीच तरी कोणी चोर गावाची सीमारेषा पार करूच शकत नाही असाही अनेकांचा अनुभव आहे. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका ऐकिवात आहे, त्या भीतीने का होईना ते गाव चोरांपासून सुरक्षित आहे.
शनी मंदिरातील दर्शनाचे नियम:
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी देव चौथऱ्यावर उभे असल्याने कधीही दर्शन घेऊ शकता, मात्र शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन घेतात. पुरुषांनी चौथऱ्यावर दर्शनाला जाण्यापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात केली आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली बाहुली खरेदी करतात आणि आपल्या घराच्या दाराबाहेर लावतात. त्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते असे वास्तू शास्त्रात म्हटले जाते.