Shardiya Navratri 2024 Durga Saptashati Path Rules: या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।। मराठी वर्षाच्या चातुर्मासातील नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. देवीची शक्तीस्वरुप निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यासाठी शारदीय नवरात्रोत्सवाचा कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे. नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. ०३ ऑक्टोबर २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ या कालावधी नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे.
देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांमध्ये श्रीदुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक भविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात. नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्यफलदायक मानले गेले आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते. दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून ‘दुर्गा सप्तशती’ची सर्वदूर ख्याती आहे. शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीयय ग्रंथ आहे. सर्व पुराणात ‘मार्कंडेय पुराण’ प्राचीन मानले जाते व ‘दुर्गा सप्तशती’ त्यातील अंश आहे. दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात. मात्र, धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. तेव्हा काळजी करू नये. यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल.
दुर्गा सप्तशती ग्रंथात तीन भागात १३ अध्याय
दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ आहे. या ग्रंथात १३ अध्याय असून, तो तीन भागात विभागण्यात आला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्यायात भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या स्वरुपांविषयी वर्णन करण्यात आले आहे. मुळात या ग्रंथात ५६८ श्लोकच होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या ७०० झाली. म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने ‘दुर्गा सप्तशती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधु कैटभ वधकथा, मध्यक्रमात महिषासुर संहार आणि उत्तरार्धात शुंभ-निशुंभ वध तसेच देवीकडून सुरथ आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानांविषयी विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
कशा प्रकारे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पुण्य कसे मिळेल?
आजच्या काळातील धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. मात्र, यावर एक सोपा असून, कमी वेळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पूर्ण पुण्य मिळू शकते. सर्वप्रथम कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. यानंतर कुंजिका स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. एका पौराणिक कथेनुसार, महादेव शिवशंकरांनी पार्वती देवीला या उपायाबाबत सांगितल्याचे म्हटले जाते.
नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे
पुराणातील एका कथेनुसार, महादेव शिवशंकर आणि माता पार्वती यांच्यातील एका संवादादरम्यान शिवाने पार्वती देवीला दुर्गा सप्तशती पाठाचे संपूर्ण पुण्य कसे मिळवावे, याबाबत सांगितले. कुंजिका स्तोत्र पठण केल्यास दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते. मात्र, कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्रांचा वापर कधीही कुणाचे अहित करण्यासाठी करू नये. अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसान होते. कुंजिका स्तोत्रासह कवच, कीलक व अर्गला स्तोत्र म्हणावे. मात्र, नेमून दिलेल्या क्रमानेच पठण व्हावे, असे सांगितले जाते.
दुर्गा सप्तशती पठणाचे शुभ लाभ
नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि कृपादृष्टी लाभते. अनेक संकटातून बाहेर पडण्यास यामुळे मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय पठणाचे विविध लाभ मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असे सांगितले जाते. दुर्गा सप्तशती पठणानंतर दान करणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. यथाशक्ती आणि यथासंभव दान करावे. असे केल्याने प्रत्येक कठीण टप्प्यावर देवीचे शुभाशिर्वाद, कृपा, पाठिंबा मिळतो, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
कुंजिका स्तोत्र पठणाचे फायदे
नवरात्रात कवच, कीलक व अर्गला पठणानंतर कुंजिका स्तोत्र म्हणणे विशेष फलदायी मानले गेले आहे. यामुळे केवळ संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होत नाही, तर आर्थिक समस्येतून मुक्तता मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. हितशत्रू, विरोधक नामोहरम होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक वार्ता मिळू शकते, असे म्हटले जाते. तसेच याच्या पठणामुळे जीवनातील बहुतांश समस्या, अडचणी, आव्हाने, प्रश्न यांचे निराकरण शक्य होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.