आजपासून शिर्डीच्या साईबाबांचा उत्सव सुरु होत आहे. उत्सवाच्या निमित्ताने अनेकांना साईबाबांच्या दर्शनाची इच्छा होईलही. मात्र ज्यांना तिथे जाणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी हा पर्याय! शिर्डीच्या साईबाबांच्या देवळाची आठवण व्हावी अशी बाबांची प्रति शिर्डी पुण्याजवळच्या शिरगावात आहे. साईबाबांचे प्रशस्त मंदिर, पंचतारांकित हॉटेलसदृश श्री साई अन्न छत्र आणि मंदिराच्या गाभाऱ्यात साईंची संगमरवरी मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची रीघ लागते.
मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा या टोल नाक्यावरून डाव्या बाजूला पाच किलोमीटर अंतरावर हे साई स्थान आहे. शिर्डीच्या देवस्थानची पदोपदी आठवण येईल अशा खुणा या मंदिरातही आहेत. भव्य मंदिर, प्रशस्थ परिसर, नयनरम्य बाग, साईंचा दरबार, सोनेरी आणि पिवळसर रोषणाई असलेली प्रकाशयोजना, गाभाऱ्यात आरसे आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती चित्त वेधून घेते.
पुण्याचे माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये हे मंदिर तयार झाले, मात्र तेथील स्वच्छतेमुळे आजही त्या मंदिराची नवलाई टिकून आहे. या परिरसरात साई बाबांची धुनीदेखील आहे, तसेच शिर्डीसारखे कडुलिंबाचे झाडदेखील आहे. तिथे दरदिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी प्रसादालय अर्थात अन्नछत्र देखील उभारले आहे.
साई अन्नछत्राचे बांधकाम एवढे सुंदर झाले आहे की तिथे प्रवेश करताना आपण अन्नछत्रात जात नसून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जात आहोत कि काय असा भास होतो. आतमध्येही सुंदर रोषणाई, सुविचार, साईंचे फोटो आणि अन्न वाटप केंद्र. स्वच्छ खणाच्या ताटात पोटभर प्रसाद आणि थंडगार पाणी दिले जाते. तो प्रसाद कोणी ताटात टाकू नये अशी सूचना केली जाते. तिथे एकावेळी १००० भाविक भोजन करू शकतील एवढी मोठी बैठक व्यवस्था आहे. ती तीनमजली इमारत राजवाडा म्हणूनही ओळखली जाते.
गुरु पौर्णिमा, दसरा, राम नवमी इ. महत्त्वाचे उत्सव तिथे साजरे केले जाते. मात्र मंदिराच्या सभोवतालच्या परिसराचा अजून म्हणावा तसा विकास झालेला नाही. ती वस्ती अजूनही बकाल आहे. जत्रासदृश खेळणी, बायकांसाठी दागिन्यांचे तर मुलांसाठी खाऊचे स्टॉल, देवाची उपकरणी, रुद्राक्ष माळा, सरबताची दुकानं मंदिराबाहेर आहे. तिथला विकास झाला, नेटके नियोजन झाले, तर आणखी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे येऊ शकतील हे नक्की. भविष्यात साईबाबाच ती योजना करून घेतली, तोवर आपण श्रद्धा आणि सबुरी ठेवू.