आज फाल्गुन वद्य तृतीया, तिथीनुसार शिवजयंती. आपल्या पराक्रमाने दाहीदिशा उजळून टाकणाऱ्या आणि हिंदुधर्म रक्षिणाऱ्या महापराक्रमी शिवसूर्याची आज जयंती. महाराजांसारखा युगपुरुष जन्माला येणे हे तर भारत भूमीचे सौभाग्य. महाराजांनी आपल्या कृतीतून, उक्तीतून, व्यक्तिमत्त्वातून भारत मातेचा सुपुत्र कसा असावा याचा आदर्श घालून दिला. त्याची उजळणी म्हणून शिवजयंतीचे औचीत्त्य! केवळ शिवाजी महाराज की जय म्हणून शिवजयंती साजरी होणार नाही, त्यानिमित्ताने महाराजांच्या चरित्राची वारंवार उजळणी होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कवी भूषण यांनी चारोळीत केलेली शिवस्तुती आपण तोंडपाठ करायला हवी आणि मुलांकडून पाठ करून घ्यायला हवी. अजय-अतुल यांनी त्याला सुंदर चाल दिली आहे, शिवाय लता दीदींच्या आवाजातही ही शिवस्तुती ऐकता येते. पण ती ऐकण्याबरोबर तोंडपाठ असेल तरच त्या शब्दांचे चैतन्य अनुभवता येईल.
इंद्र जिम जंभ पर बाड़व ज्यौं अंभ पर रावन सदंभ पर रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर चीता मृगझुँड पर भूषन बितुंड पर जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर कान्ह जिम कंस पर यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥
अर्थ : भूषण कवी म्हणतो, की ज्या प्रकारे इंद्राने जंभासुर राक्षसावर हल्ला करून त्याचा वध केला होता आणि ज्याप्रकारे अग्नी समुद्राच्या पाण्याला जाळून शोषून घेतो, त्याप्रमाणे श्रीरामांनी गर्विष्ठ व कपटी रावणावर हल्ला केला होता. ढगांवर वाऱ्याचा जसा प्रभाव असतो तसा त्यांचा प्रभाव होता. परशुरामाने ज्याप्रमाणे सहस्रबाहू (कार्त्तवीर्य) राजावर हल्ला करून वध केला, त्याचप्रमाणे भगवान शिवाने रतीचा पती कामदेव याला जाळून टाकले होते. ज्याप्रमाणे जंगलातील आग झाडांवर आपला क्रोध दाखवते आणि ज्याप्रमाणे वनराज सिंहाची हरणांच्या कळपाला दहशत असते किंवा मृगराज सिंह बलाढ्य हत्तीवर नियंत्रण मिळवतो, सूर्यकिरणांनी अंधार नाहीसा होतो, दुष्ट कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. अशाच सिंहाप्रमाणे शौर्य आणि पराक्रम असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल राजवटीवर दहशत निर्माण केली. मुघलांना कडाडून विरोध केला आणि त्यांच्यावर शौर्याने, पराक्रमाने हल्ला करून त्यांचा सर्वनाश केला, अशी सिंहगर्जना करणारे शिवराय शत्रूसाठी कायम कर्दनकाळ ठरले.
ही केवळ शिवस्तुती नाही, तर पराक्रम कसा गाजवायचा याचा वस्तूपाठ आहे. आपल्या क्षेत्रात आपले स्थान कसे निर्माण करायचे, आपल्या व्यक्तीत्त्वाची छाप कशी पाडायची याचा धडा आहे. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे रोज देवाचे श्लोक म्हणतो तसे हे स्तोत्र समजून नित्य पठन करावे. जेणेकरून नैराश्य, मरगळ दूर होईल आणि चैतन्य निर्माण होऊन स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण होईल आणि शिवरायांप्रमाणे आपले विचार, कृती, आचरण शुद्ध होऊन आपणही नैतिकतेने विजय प्राप्त करू. जय भवानी, जय शिवाजी!