शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र गायन करण्यात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतले. म्हणूनच ते स्वतःला शिवअभ्यासक किंवा इतिहासअभ्यासक न म्हणता शिव शाहीर म्हणत असत. त्यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेले शिव चरित्र वाचनीय आणि चिंतनीय आहे. ते आपल्या ओजस्वी लेखणीतून शिवकाळ आपल्या डोळ्यासमोर उभा करतात. शिवजयंतीनिमित्त त्यातीलच शिवजन्माचा प्रसंग त्यांच्या शब्दांतून पाहूया.
जिजाऊ गडावर उभं राहून सह्याद्रीकडे आशेने बघत होत्या आणि सह्याद्रीसुद्धा त्यांच्याकडे आशेने बघत होता. फाल्गुन वद्य तृतीया उजाडली. आकाशांतल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. प्रभेचे तीक्ष्ण बाण सोडीत व अंधारात विध्वंस उडवीत उषा आणि प्रत्युषा क्षितिजावर आल्या. सगळी सृष्टी उजळू लागली. बालसूर्याच्या स्वागतासाठी स्वर्गाचे देव जणू पूर्वेकडे ओंजळी भरभरून गुलाल उधळू लागले. पूर्वा रंगली. वारा हर्षावला. पांखरे आकाश घमवू लागली. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई-चौघडा वाजू लागला आणि अत्यंत गतिमान सप्तअश्व उधळीत बालसूर्याचा रथ क्षितिजावर आला !
घटकांमागून घटका गेल्या....दारावरचा पडदा हलला. उत्सुकतेच्या भिवया वर चढल्या. माना उंचावल्या. बातमी हसत हसत ओठांवर आली. मुलगा ! मुलगा ! मुलगा !
शिवनेरीवर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडू लागली. संबळ झांजा झणाणू लागल्या. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा ! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस अमृताचा! त्या दिवसाला उपमाच नाही ! शुभ ग्रह, शुभ नक्षत्रे, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळे, शुभ निमिषे- तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली तीनशे वर्षे शिवनेरीच्या भोवती घिरट्या घालीत होती! आज त्यांना नेमकी चाहूल लागली! आज ती सर्वजण जिजाऊंच्या दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधिरली आणि पकडालाच त्यांनी तो शुभ क्षण ! केवळ शतकां-शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो !
शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरांत, उत्तरायणांत, फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूंत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सुर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी, दिनांक १ मार्च १६३० रोजी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाऊंच्या उदरी शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला !