>> मकरंद करंदीकर.
हिंदू तिथीप्रमाणे १७ मार्च २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आत्तापर्यंत आपण महाराजांची जयंती हिंदू तिथीप्रमाणेच साजरी करत होतो आता ती तारखेनुसारही साजरी होऊ लागली आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लक्षात घेता असा सोहळा नऊ दिवस, दहा दिवस साजरा केला तरी कमीच आहे. पण शिवजयंतीचा दिवस, दोन वेळा साजरा करण्यामुळे एक चुकीचा संदेश पोहोचू शकतो. शिवाजी महाराजांनी कुठल्याही सत्तेसमोर न नमता त्यांना आव्हान देऊन, अनेक युद्धे आणि चढाया जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. खुद्द जे इंग्रज नजराणे घेऊन महाराजांपुढे नतमस्तक झाले, त्या इंग्रजांच्या कॅलेंडरनुसार शिवजयंती साजरी करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पडतो ! ज्यांच्या काळामध्ये इंग्रजी कॅलेंडरच मानले जात नव्हते, ज्या राजांनी स्वतःच्या नावाचा शक सुरू केला त्या शककर्त्या राजाची जयंती परक्या राज्यकर्त्यांच्या कॅलेंडरनुसार साजरी करण्याचे प्रयोजनच काय ? छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची महती आपण आत्ताच पाहिली. हिंदू धर्माप्रती या पितापुत्रांची बांधिलकी सर्वांनाच माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छोट्या मूर्तीला, जयंतीनिमित्त हिंदू पद्धतीने पंचामृताचा अभिषेक केला जातो, पालखीतून नेण्याचा सन्मान केला जातो. त्यांची जयंती मात्र इंग्रजी तारखेनुसार? असो!
आज तिथीनुसार शिवजयंती! आनंदाची गोष्ट म्हणजे आता तर छत्रपती शिवाजी महाराजांची ठिकठिकाणी मंदिरेही होऊ लागली आहेत.
पुण्यामध्ये शनिपारावर पूर्वापार असलेल्या शनि आणि मारुतीच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला, अष्टभुजा भवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत आहे, अशा धातूच्या भित्तीमूर्तीचे ( म्युरल ) एक अगदी छोटेसे मंदिर पाहायला मिळते. आपण गणेशापुढे मूषक, विष्णुपुढे गरुड, रामापुढे मारुती, शंकरापुढे नंदी अशी वाहने नेहमी पाहतो. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही शोभून दिसेल असे सिंह वाहन या मूर्तीपुढे पाहताना खूप आनंद होतो.
आज संकष्टी आणि तिथिनुसार शिवजयंती; त्यानिमित्त पाहू शिवाजी महाराजांचे कसबा गणपतीशी नाते!
प्रत्येक शिवभक्ताने हे मंदिर बघायलाच हवे. पुण्यात गेल्यावर या मंदिराला आवर्जून भेट द्या. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराय महाजयंती निमित्त, महाराजांना त्रिवार वंदन !
ई-मेल : makarandsk@gmail.com