देवघरात मोजकेच देव ठेवावेत हे आपण जाणतो. त्यात बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता ही माहेरून मिळालेली असल्याने तिचा देवघरात समावेश असतोच, शिवाय गणपती, दत्तगुरु किंवा स्वामी, शंकराची पिंडी या पंचदेवतांचा मुख्यत्त्वे समावेश असावा असे शास्त्र सांगते. प्रामुख्याने गणेश, देवी, सूर्य, विष्णू आणि शिव हे पंचायतन पूजन शास्त्राला अभिप्रेत आहे. अशातच महादेवाचे शिवलिंग ठेवण्याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो, त्याबद्दल जाणून घेऊ.
देवघरात महादेवाची प्रतिमा ठेवू नये असे शास्त्र सांगते, मात्र शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही. महादेव हे बैरागी असले तरी ते कुटुंबवत्सल आहेत. त्यांच्याप्रमाणे आपलाही संसार सुखाचा व्हावा यासाठी त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा ठरतो. म्हणून देवघरात शिवलिंग ठेवण्याबद्दल काहीच हरकत नाही. फक्त त्याच्याशी संबंधित काही नियमांचे आवर्जून पालन करावे आणि शुचिर्भूतता राखावी.
शिवलिंग ठेवण्याबाबतचे नियम आणि योग्य दिशा:
>>घरात सोमवारी किंवा श्रावणात रुद्राभिषेक करत असाल तर शिवलिंगावर नाग आणि समोर नंदी ठेवू नये.
>>इतर वेळी शिवलिंगावर नाग असलेली पिंडी देवघरात ठेवण्यास काहीच हरकत नाही. पुढे नंदी महाराज असतील तरीही उत्तमच!
>>शिवलिंगाची निमुळती बाजू जिला वाहिनी असे म्हणतो, ती उत्तर दिशेला हवी.
>>शिवलिंगाची पूजा करताना त्याला भस्मलेपन करावे, कुंकू लावू नये. पांढरी फुले आणि बेल वाहावे.
>>शिवलिंगाला गंधलेपन करताना अनामिका, मध्यमा आणि तर्जनीचा एकत्रित वापर करावा.
>>अशी शेवटची तीन बोटं एकत्रित ओढल्याने तयार होणाऱ्या गंधाला त्रिपुंड असे म्हणतात. ते चंदन किंवा भस्माने लावले जाते.
>>देवघरात शिवलिंग नसेल तर रुद्राक्षावरही अभिषेक करता येतो.