अलीकडे अनेक जण शिव तांडव स्तोत्र पाठ करतात, म्हणतात, त्यावर नृत्य करतात आणि काही जण तर रिंगटोनही ठेवतात. मात्र अशी शिवभक्ती खुद्द शिव शंभूलाही पसंत नाही. त्या उपासनेने होणारे तोटे वाचलेत तर यापुढे तुम्ही देखील वरील चुका करणार नाही.
शिव तांडव स्तोत्राची पार्श्वभूमी:
हे स्तोत्र शिव स्तुती असून लंकाधीश रावण त्याचा रचेता आहे हे आपण जाणतोच. परंतु ही स्तुती त्याने कोणत्या स्थितीत केली आणि त्या रचनेचा त्याला काय लाभ झाला हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.
रावण हा शिवभक्त होता. लंकेत शिवाचे स्थान असावे या विचाराने त्याने शिवाची आराधना केली, मात्र शिव प्रसन्न झाले नाही म्हणून रावणाने अहंकाराच्या भरात कैलास पर्वतच मुळासकट उपटून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला. या कृतीचा शिव शंकरांना राग आला आणि त्यांनी आपल्या नुसत्या अंगठ्याने रावणाला पाताळाच्या दिशेने दाबले. त्यामुळे रावण गयावया करू लागला आणि त्याने हि शिवस्तुती रचली. शंकराचा राग शांत झाला आणि रावणाची शिव कोपातून सुटका झाली. मात्र रामाविरुद्ध लढाईत रावणाने याच स्तोत्राचा पुनर्वापर करून पाहिला तेव्हा मात्र शंकरांनी दुसऱ्याच्या विनाशाची इच्छा धरणाऱ्या रावणाला तुझाच पराभव होईल असा शाप दिला.
यावरून लक्षात घेतले पाहिजे, की शिव तांडव स्तोत्र ही शिव स्तुती असली तरी ती फलदायी नाही, कारण त्याच्या रचनाकारावरच शिवकृपा झाली नाही तर आपल्यावर शिवकृपा कशी होणार? त्यामुळे उपासना म्हणून हे स्तोत्र म्हणू नये असे धर्मशास्त्र सांगते.
शिव तांडव स्तोत्र घरात म्हटल्याचे दुष्परिणाम:
शिव तांडव स्तोत्रातील तांडव हा शब्द लक्षात घेतला तरी कळेल, की विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर म्हटले गेलेले स्तोत्र आहे. त्यातील प्रखर शब्द, त्यांचे उच्चारण आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. हे स्तोत्र वीर रस जागृत करणारे असले तरी ते घरात म्हणण्याचे काहीच कारण नाही. तसे केले असता घराची युद्धभूमी होऊ शकते. तो धोका टाळायचा असेल तर घरात शिव तांडव स्तोत्राचे उच्चारण करू नका.
तांडव नृत्यासाठी स्तोत्राचा वापर
नृत्य कलेत सर्व तऱ्हेचे भाव दर्शवले जातात. त्यात सर्व रसांचाही समावेश केला जातो. त्यामुळे नृत्य सादरीकरणाच्या दृष्टीने रौद्र रसासाठी या स्तोत्राचा वापर केल्यास हरकत नाही, मात्र या व्यतिरिक्त स्तोत्राचे गांभीर्य जाणून घेत त्याचा सर्वसामान्य ठिकाणी वापर टाळणे हिताचे ठरते.