>> जगन्नाथ मनोहर चव्हाण
शुक्राचार्य मंदिर हे कोपरगाव येथे गोदावरीच्या तीरावर वसलेले भारतातील एकमेव शक्तिशाली व पवित्र स्थान आहे. या मंदिराला अती प्राचीन, पौराणिक व धार्मिक संदर्भ आहे. या पवित्र भूमीचे अस्तित्व आध्यात्मिकच नाही तर दैवी स्वरूपाचे आहे. या जागेवर वर्षानुवर्षांपासून सिद्ध होत असलेले महामृत्युंजय याग, होमहवन, लघुरुद्र-महारुद्र, यज्ञकार्य यांच्या पवित्र कंपनांमुळे निर्माण झालेली ऊर्जाशक्ति अद्भुत आहे. त्यामुळे लाखों भक्तगण येथे नतमस्तक होतात.
शुक्राचार्यांनी भगवान शिवाची उपासना करून 'संजीवनी विद्या' प्राप्त करून या मंत्राची सिद्धता या स्थानी केली. पौराणिक संदर्भानुसार ब्रह्मदेवाचे पौत्र अंगिरस ऋषी यांचे पुत्र बृहस्पती हे देवांचे गुरु होते. तसेच ब्रह्मदेवाचे दुसरे पौत्र भार्गव ऋषी यांचे पुत्र शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते. बृहस्पती यांचे पुत्र कच व शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांची प्रेमकथा येथेच फुलली.
सूर आणि असुर यांच्या युद्धात अनेक वेळा असुर देवांवर विजय मिळवत असत. कारण शुक्राचार्य संजीवनी मंत्राचे उच्चारण करून असुरांना जिवंत करत. म्हणून संजीवनी मंत्राची प्राप्ती करण्यासाठी कच यांस शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. शुक्राचार्यांनी त्याचा स्वीकार करून कच यांस संजीवनी मंत्र येथेच शिकविला. अशी एक थोर गुरु-शिष्य परंपरा या स्थानास लाभलेली आहे.
ज्यावेळी राजा ययातीने देवयानीचे पाणिग्रहण केले त्यावेळी सिंहस्थ काळ सुरु होता व ग्रहनक्षत्र अनुकूल नव्हते. तेव्हा शुक्राचार्यांनी येथे एक महायज्ञ करून संपूर्ण भूमी आपल्या तपोबलाने पावन केली व ग्रहनक्षत्र अनुकूल करून घेतले तेव्हा ययाति देवयानी विवाह संपन्न झाला. तसेच त्यांनी या भूमीला वरदान दिले की, येथे कुठलाही शुभ मुहूर्त नसला तरी येथे विवाह संपन्न होऊन यशस्वी होतील.