व्हिएतनाम हा आग्नेय आशियातील एक देश. एका शैक्षणिक उपक्रमाच्या निमित्ताने पुण्याच्या जर्मन भाषेच्या शिक्षिका गौरी ब्रह्मे सध्या तिथे गेल्या आहेत. तिथल्या संस्कृतीबद्दल आलेले अनुभव कथन करताना त्यांनी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कपड्यांचा मुद्दा अधोरेखित केला आहे. ज्यावरून आपल्या देशात स्वातंत्र्यावर गदा वगैरे म्हणत मोर्चे काढले जातात, निषेध नोंदवले जातात. याबाबतीत परदेशात स्थिती काय आहे, हे आपण गौरी ताईंच्या लेखणीतून जाणून घेऊ.
काल हानॉईमधल्या पॅगोडामध्ये जाऊन आलो. पॅगोडा म्हणजे इथलं मंदिर. एका मोठ्या तळ्याकाठी अगदी सुरेख वसलेलं मंदिर आहे हे. मुख्यद्वारापाशीच पाटी दिसते "तोकडे कपडे घालून आत प्रवेश नाही". गंमत म्हणजे हे पाहायला, चेक करायला कोणी माणूस ठेवलेला नसताना देखील नियम व्यवस्थित पाळला जात होता. सगळ्यांकडून, अगदी परदेशी टुरिस्ट बायका पुरुषांकडूनही. पवित्र वास्तूंचे पावित्र्य आणि आपल्या संस्कृतीची आच आपणच ठेवली नाही तर ती इतर लोक काय आणि किती ठेवणार?
व्हिएतनामी लोक बरेचसे आपल्यासारखे वाटतात मला. आशियाई लोकांमध्ये एखादा समान धागा तरी सापडतोच. अनेक लोक ऑफिसला जायच्या आधी दर्शन घ्यायला देवळात आले होते. काहीजण गाभाऱ्यात बसून जप करत होते, स्तोत्र म्हणत होते. बायका, आज्या मैत्रिणीसोबत छान तयार होऊन दर्शनाला आल्या होत्या. मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि शांत होता. कुठेही गडबड नाही गोंधळ नाही. चपला काढून आत यायचं, देवाला उदबत्ती ओवाळायची, नैवेद्य (फळं, बिस्किटांचे, चॉकलेट्सचे बॉक्स) आणला असेल तर देवासमोर ठेवायचा, पैसे ठेवायचे, नमस्कार करायचा (साधारण आपल्यासारखाच नमस्कार आहे) असा शिरस्ता आहे. देवाला पंचमहाभूते अर्पण करावीत असा इथे समज आहे. त्यामुळे पाणी, अग्नी, वारा, तेज आणि आकाश या पाचही गोष्टी देवासमोर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दिसतात. एका दुकानातल्या देव्हाऱ्यात बियरची बाटली देवासमोर ठेवली होती. देवाला बियर किंवा दारू वाहणे तिथे साधारण मानले जाते.
मंदिरात आत येताना आम्ही विक्रेत्यांकडे छोट्या पिंजऱ्यातले पक्षी आणि छोट्या प्लास्टिक बाऊलमध्ये जिवंत मासे पाहिले होते. आधी समजलंच नाही की बंदिस्त पक्षी आणि मासे असे बाहेर का विकतायत. आत गेल्यावर एका गाईडच्या बोलण्यातून समजलं की ते देवाला अर्पण करण्यासाठी आहेत. आपल्या हातून एखादी चूक झाली असेल, पाप घडलं असेल तर देवासमोर पक्षी किंवा मासे ठेवायचे. इथले गुरू त्यांना तुमच्यासाठी परत पाण्यात किंवा हवेत मोकळं सोडतात की झालं तुमचं पापक्षालन! अनेक लोक हे पिंजरे देवासमोर ठेवत होते. मनात विचार सुरू झाला, या पांढऱ्या शर्टवाल्याने नक्की कुठलं बरं पाप केलं असेल? निळ्या ड्रेसवाली बाई पिंजरा देवासमोर ठेवताना इतकी का दुःखी दिसते आहे? मानवी मन गमतीशीर असतं. दुसऱ्याच्या पापाचा विचार माझ्या मनात लगेच आला पण स्वतःबद्दल मात्र नाही. पण अगदी आठवण्यासारखं किंवा लक्षात राहण्यासारखे पाप किंवा चूक मी अलीकडे केली नाहीये त्यामुळे पिंजरा प्रकार माझ्यासाठी तरी सध्या फक्त बघण्यापुरता राहिला.
इथे प्रामुख्याने बौद्धधर्म पाळला जातो गाभाऱ्यात मात्र फक्त बुद्धाची मूर्ती न दिसता अनेक मूर्ती असतात. कन्फुशियस या महान तत्ववेत्त्याला इथे खूप मानले जाते, त्याची मूर्तीही इथे बरेचदा दिसते. व्हिएतनाम हा आस्तिक देश असला तरी प्रत्येकाला हवा तो धर्म पाळण्याच स्वातंत्र्य इथे आहे. निदान कागदावर तरी असच आहे. मंदिरात दानपेट्याही भरपूर दिसल्या. यथाशक्ती लोक त्यात पैसे टाकत होते. इथले पैसे हा एक आणखी गहन विषय आहे. चॉकलेटी रंगाचा पूर्ण भिक्षुकी पोशाख घातलेल्या बायका इथे गुरू म्हणून काम बघत होत्या. हे पाहून छान वाटलं.
प्रत्येकाला देवाशी, स्वतःशी बोलण्यासाठी एक शांत जागा हवी असते. आपल्या अंतर्मनात डोकावायला शांत चित्त हवं असतं. मंदिरासारख्या सुंदर जागा ती आपल्याला देतात. त्यात या जागी स्वच्छता, शांतता, शुचिता राखली जात असेल तर नथिंग लाईक इट! पगोडातून बाहेर पडताना मी हाच विचार बाहेर घेऊन पडले, देवाने सतत आपली सद्सदविवेकबुद्धी जागी ठेवो. आपल्या हातून कधीही एखादा पिंजरा किंवा माश्याचा बाऊल त्याच्यासमोर ठेवण्याची वेळ न येवो.
छायाचित्र : गौरी ब्रह्मे