हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. पुरातन धर्म आहे. याबद्दल कुठेही वाद नाही. वाद आहे तो प्राचीन म्हणजे किती प्राचीन, याबद्दल स्मृतिकार मनूने 'वेदोखिलं धर्ममूलं, स्मृतिशीले च तद्विदाम् आचारश्चैव साधूनाम् आत्मन: तुष्टिरेव च!' असे म्हटले आहे. या सुप्रसिद्ध श्लोकात प्रथमत: वेद प्रामाण्य, वेदानुसार करायचे आचार, साधुसंतांचे वागणे आणि धर्माचरण अशी सविस्तर माहिती मिळते.
धर्म ही संकल्पना वेदकालापासून किंवा त्याच्याही आधीपासून आहे हे मानल्यानंतर स्वाभाविकच वेद किती प्राचीन असावेत हा प्रश्न निर्माण होतो. याबद्दल लोकमान्य टिळक, चिंतामणराव वैद्य, महामहोपाध्याय पा.वा.काणे इ. मान्यवरांच्या मते हा काळ इसवीसनापूर्वी चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा असावा. कृष्णशास्त्री राजवाडे यांच्यासारख्या संशोधकांनी मात्र वेदकाल हा ३५ हजार वर्षांहून प्राचीन असावा असे अनुमान केले आहे.
अशा वेद ग्रंथांबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिथे कुतूहल तिथे शंका उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. अशीच एक शंका एका अनुयायीनी गुरु श्री श्री रविशंकर यांच्याकडे उपस्थित केली होती, ''वेदाचे पठण कोणी करावे? तो अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे का?' यावर ते उत्तरले, 'वेदांचे पठण कोणीही करू शकतो. त्याला धर्म जातीची बंधने नाहीत. वेदाभ्यास करून ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण झाला. ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नसून तो क्रियावाचक आहे. तीच बाब क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांचीही! ही कामानुसार ठरवलेली वर्णव्यवस्था आहे. तिला जातीव्यवस्था हे नाव दिल्यामुळे मूळ संकल्पनेत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे वकिलीचा अभ्यास करणारा वकील, डॉक्टरकीचा अभ्यास करणारा डॉक्टर होतो, तसा वेदांचा अभ्यास करून ब्रह्मज्ञान मिळवणारा ब्राह्मण होतो. उलट ते ज्ञान सर्वांनी घ्यावे आणि सुज्ञ व्हावे.''
इतक्या प्रदीर्घ कालावधीत तो धर्म अखंडितपणे सातत्याने टिकून राहिला त्या मूळ प्रवाहात अनेकानेक विचारांच्या उपप्रवाहांचा समावेश होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वेदप्रामाण्य हा हिंदुधर्माचा प्रमुख निकष असला तरी वेदकाळात ज्यांची पुसटती कल्पनाही येणे शक्य नव्हते अशा बहुविध बदलांना आणि आघातांना मागील हजारो वर्षात मानवी समाजाला वारंवार सामोरे जावे लागले आणि त्या त्या वेळी समाजाला ययोग्य मार्गदर्शन करणे हेच ज्यांनी स्वत:चे जीवनकर्तव्य मानले अशा ऋषीमुनींनी भिन्न भिन्न काळी आपापल्या मतानुसार जे जुने यमनियम पुन्हा नव्याने सांगितले, प्रसंगी त्यात बदल केले अथवा नवीन नियम घालून दिले, तेच समाजासाठी जागरुक असलेले धर्मशास्त्रज्ञ पुढे स्मृतिकार म्हणून अखिल हिंदुना मार्गदर्शक ठरले.
मूळ वेदातील धर्मविषयक वचनांना अनुसरून मधल्या काळात धर्मसूत्रे म्हटली जाणारी काही सूत्रे प्रचलित होती, काही कालौघात नष्ट झाली. नंतरच्या काळात विविध अग्रेसर मुनींनी जे सुबोध आणि आदर्शभूत ठरणारे स्मृतिग्रंथ लिहिले त्यांनाच विशेष महत्त्व प्रप्त झाले आणि ते महत्त्व आजपर्यंत अखंडपणे टिकून आहे.