गुरुवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी माघ वद्य प्रतिपदा म्हणजे "गुरू प्रतिपदा" आहे. याच दिवशी इस १४५८ साली श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळीवनात अवतार गुप्त ठेवला. व ३०० वर्षांनी पौष शुद्ध द्वितीया इस १७५८ मध्ये स्वामी समर्थ अवतार प्रकट केला. श्री. केतन कुलकर्णी यांनी आजच्या दिवसाचे महात्म्य, पूजा आणि नैवेद्य याबद्दल माहिती दिली आहे.
गुरु प्रतिपदेला गाणगापूर सोडताना भक्तांनी श्रीगुरू महाराजांना सोबत बेसनाचे लाडू दिले. महाराज तर गाणगापूर मठातच गुप्त राहणार होते. पण भक्तांचा भाव पाहून त्यांनी प्रेमाचे लाडू बरोबर घेतले. गाणगापूर येथे येण्यापूर्वी महाराजांनी परळी वैजनाथ येथून काशी पासून सोबत असलेला भक्त, शिष्य, संन्यासी गणांचा चमू भारतवर्षातील सर्व तिर्थयात्रा करायला धाडला व मी बहुधान्य नाम संवत्सरात श्रीशैल्य येथे अवतार समाप्ती निमित्ताने येईल, तेथे तुम्ही सर्वांनी यावे असे आदेशित केलं होतं. त्या नुसार ही शिष्य मंडळी श्रीशैल्य येथे येऊन महाराजांच्या प्रतिक्षेत होती. परळी वैजनाथ ते गाणगापूर हे अवतार कार्य जवळपास ३७ वर्षांचं होतं. इतक्या मोठ्या प्रतिक्षेनंतर श्रीगुरुंची व आद्यशिष्यांची भेट झाली.
महाराजांसोबत गाणगापूर सोडताना साखरे सायंदेव, दोघं नंदी कविश्वर व सिद्ध होते. कुरवपूरचा पुर्वाश्रमीचा भक्त रविदास म्हणजे बिदरच्या बादशहाला महाराजांनी परस्पर श्रीशैल्य येथे यायला सांगितले होते. येथेच महाराजांनी बादशहाला व साखरे सायंदेवांना श्रीशैल्य येथून कुरवपूर येथे जाऊन मंदिर निर्माण करण्यासाठी आदेशित केले. आज जे कुरवपूर मंदिर व ओवरी आपण पाहतोय ती या दोघांनीच बांधून घेतली आहे.
आजच्या दिवसाचे महत्त्म्य जाणून घेत १७ फेब्रुवारी २०२२ रोजी अवतार परंपरा म्हणून आपल्या देवघरात महाराजांची किंवा दत्त गुरूंची पूजा करून बेसन लाडू नैवेद्य दाखवून तो छोट्या बंद डब्यात अहोरात्र देवघरात ठेवावा व दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करावा.