श्रावण अर्ध्यावर आला, की आपल्याला चाहुल लागते गोकुळाष्टमीची! हा उत्सव आपल्याकडे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. दहीहंडीच्या निमित्ताने सगळे मतभेद विसरून बाळ गोपाळ एकत्र जमतात आणि मानवी मनोरा रचून हंडी फोडतात. सगळे मिळून अष्टमीचा आणि काल्याचा उत्सव साजरा करतात. ते मनोहारी रूप पाहून आपल्याही मनात कृष्णकथेबद्दल प्रेम उत्पन्न होते. असाच एक उत्सव उत्तर प्रदेशात रंगतो, त्याला म्हणतात 'झूलन पौर्णिमा' आणि तो उत्सव साजरा करण्यासाठी भरते 'झूलन यात्रा.'
वैष्णव जनांसाठी हा उत्सव अतिशय महत्वाचा असतो. होळी आणि गोकुळाष्टमी इतकेच या उत्सवाला तिथे महत्त्व असते. हा उत्सव श्रावण शुक्ल दशमी ते पौर्णिमा असा दीर्घकाळ चालतो. यावेळी राधा-कृष्णाची मूर्ती झोपाळ्यावर ठेवून त्याला झोके दिले जातात. त्यावेळी जमलेल्या स्त्रिया कृष्णगीते गातात. अनेक मंडळींकडे कृष्णकथेचे आयोजनही केले जाते.
राधा कृष्णाच्या प्रेमाचे गोडवे आपल्या भागवत पुराण, गीत गोविंद, कृष्णकथेतून नेहमीच ऐकायला मिळतात. कृष्णावर जीव ओवाळून टाकणाऱ्या गोपिका आणि प्रिय राधा यांच्याशी केलेली रासलीला मधुरा भक्तीचे दर्शन घडवते. अशरीर प्रेमाची साक्ष देते. प्रत्येक गोपिकेला वाटते, कृष्णाने फक्त आपल्याशी बोलावे, आपल्याबरोबर झोके झुलावे. त्यांचा भोळा भाव कृष्ण पूर्ण करतो आणि प्रत्येकीचा हट्ट पूर्ण करतो.
या आख्यायिकांनुसार आजही उत्तर प्रदेशातील भाविक भगिनी झुलन पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा करतात. कृष्णाचे भजन, गाणी, रास, खेळ, झोके यांचा आनंद लुटत कृष्णमय होतात. रोजच्या सरधोपट आयुष्यात हे निवांत क्षण स्त्रियांना जगता यावेत, भक्ती, अध्यात्म या बोजड वाटणाऱ्या गोष्टी हसत खेळत आत्मसात व्हाव्यात या दृष्टीने अशा उत्सवाचे आयोजन आपल्या पूर्वजांनी केले असावे.
निसर्गात जावे, रमावे, झाडा-फांद्यांशी सलगी करावी, त्यांचे रक्षण करावे आणि त्यांच्या उंचच उंच फांद्यांवर झुलून पुनश्च बालपण अनुभवावे, हाच या उत्सवाचा गाभा असावा. हा उत्सव वृंदावनातला असला, तरी कृष्णप्रेम, कृष्णभक्ती आणि कृष्णकथांमधून मिळणारा आनंद सगळीकडे सारखाच! तर जाऊ द्या आपल्याकडेही उंचच उंच हिंदोळे...