चातुर्मासातील व्रत-वैकल्यांचा काळ म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे व वाराचे वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणी सोमवार, मंगळागौर, जिवतीची पूजा, नृसिंह पूजन, आदित्य राणूबाई पूजन यांप्रमाणे श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जिवतीचा कागद देवघरात चिकटवून त्याची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. सन २०२२ मध्ये पहिला बुधवार ०३ ऑगस्ट रोजी आहे. बुध-बृहस्पती पूजन कसे करावे? याची व्रतकथा काय? जाणून घेऊया... (Shravan Budh Brihaspati Vrat Vidhi in Marathi)
महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यांमध्ये २९ जुलै २०२२ पासून श्रावण सुरू आहे. यामध्ये ०३ ऑगस्ट, १० ऑगस्ट, १७ ऑगस्ट व २४ ऑगस्ट रोजी बुधवार, तर ०४ ऑगस्ट, ११ ऑगस्ट, १८ ऑगस्ट व २५ ऑगस्ट रोजी गुरुवार येत आहे. या दिवशी बुध-बृहस्पती व्रताचरण, पूजन केले जाऊ शकते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला देवघरात चिकटवल्या जाणाऱ्या जिवतीच्या कागदावर बुध-बृहस्पती दर्शवण्यात आलेल्या असतात. (budh brihaspati vrat puja 2022)
बुध-बृहस्पती व्रताचरण कसे करावे?
बुध-बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा केली जाते. दररोज घरातील देवतांची जशी पूजा केली जाते, तशीच साधी पूजा करावी. शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो जिवतीचा कागद चिकटवला जातो, त्यात बुध-बृहस्पतींचे चित्र रेखाटण्यात आले आहे. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे, अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल, त्यांनी ते करावे. शक्य असल्यास मुलांच्या गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात. निदान एखादे फूल, एखादे पुस्तक द्यावे. (budh brihaspati vrat puja vidhi)
बुध-बृहस्पती व्रतकथा
या व्रताची एक कथा पुराणांमध्ये सांगण्यात आली आहे. एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी सहा सुना, आम्ही कामात आहोत त्यामुळे आमचे हात रिकामे नाहीत, असे सांगून त्यांना घालवून देत असत. काही काळ गेल्यानंतर त्या राजाचे राज्य गेले. परिणामी बघता बघता ऐश्वर्य जाऊन दारिद्र्य आले. त्यांच्यापैकी सर्वांत लहान सुनेने त्या मामा-भाच्यांची योग्यता जाणली होती. तिने या मामा-भाच्यांची सर्व कुटुंबीयांच्यावतीने क्षमा मागितली. पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत, म्हणून उपाय विचारला. त्यावेळी त्यांनी हे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने हे व्रत केले. याच व्रतकाळात परराज्यात गेलेल्या तिच्या पतीच्या गळ्यात त्या देशीच्या हत्तीने अचानक फुलमाला घातली. त्यामुळे त्या राज्याच्या प्रजेने त्याला आपला राजा केले. काही काळानंतर या सात सुना आणि त्यांचे पती कामधंदा शोधत हिंडत या नव्या राज्यात आले. धाकट्याने आपल्या पत्नीला, मुलांना आणि भावंडांना ओळखले. मग ते सारे तिथेच पुन्हा वैभवात आनंदाने राहू लागले. धनसंपत्ती आणि बुद्धिमत्ता मिळावी म्हणून हे व्रत केले जाते. (budh brihaspati vrat katha in marathi)
धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मन:शांतीसाठी हे व्रत करावेसे वाटते, त्यांनी ते जरूर करावे. शक्य असल्यास आपल्या गुरुंचा आठव ठेवून त्यांना गुरुदक्षिणा द्यावी आणि मुलांच्या हातून त्यांच्या गुरुंना भेटवस्तू, फुल किंवा मनोभावे वंदन करण्यास सांगावे. त्यामुळे मुलांनाही या प्रथेची जाणीव होईल व परंपरेत सातत्य टिकून राहील. हा दिवस एकप्रकारे शिक्षक दिन म्हणून साजरा करता येईल.