>> सर्वेश फडणवीस
चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून, त्याचा संबंध आपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे. ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण आणि संपूर्ण व्रत वैकल्य एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत. श्रावणात शिवपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळेच श्रावण हा शिवपूजन, उपासना, नामस्मरण, आराधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोंत त्याबद्दल आपल्याला कायम अभिमानच वाटायला हवा. अशाच नागपूर शहरातील सीताबर्डी भागातील प्राचीन भोंडा महादेव मंदिराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खरंतर वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना म्हणजे भोंडा महादेव मंदिर आहे.
भारतीय वास्तुकला ही कायमच जगमान्य आकर्षण ठरली आहे, वास्तूंना आकर्षक बनविण्यात आपल्या शिल्पकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शिल्प कलेबद्दल बोलायचे झाल्यास भारताचा इतिहास हा सर्वात जास्त शिल्पकलेने नटल्या सारखा वाटतो. असंच हे भोंडा महादेव मंदिर अतिशय देखण्या रुपात आजही बघायला मिळते. हे भगवान शिवाचं एक प्राचीन मंदिर आहे . याला "मुंडा देव" असेही म्हणतात. नागपूर शहराच्या अगदी मधोमध हे प्राचीन मंदिर असून सुद्धा खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे. मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणी शिवस्तुतीतील पहिला श्लोक ओठावर आला,
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
श्री भोंडा महादेव मंदिराच्या प्रवेश द्वारावरच नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम लहान असले, तरी मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय आकर्षक आहे. मंदिरात इतके कोरीव काम आहे की, या सर्व मंदिरांचा मुकुटमणी ठरावे असे चित्ताकर्षक, नेत्रदीपक अत्यंत सुंदर व सुबक शिल्पांनी नटलेले मात्र अर्धवट राहिलेले मंदिर म्हणजे आपल्या सीताबर्डीवरील भोंडा महादेव मंदिर आहे.
हात नसलेल्या व्यक्तीला आपण भोंडा म्हणतो. तसेच आज या मंदिराचे केवळ गर्भगृहच शिल्लक आहे. याला सभामंडप नाही, स्तंभ स्थापत्य नाही, म्हणून या मंदिरास भोंडा मंदिर म्हणतात. या मंदिराचे वर्णन असे आहे की संपूर्ण मंदिर लालसर असून दगडांच्या शिल्पाने ते नखशिखांत कोरलेले आहे. एक इंचही जागा रिकामी नाही इतकी सुंदर शिल्पाकृती मंदिराच्या आत आणि बाहेर कोरलेली आहे. या मंदिराच्या प्रत्येक भागात शिल्प, शिल्प आणि शिल्पच आहे. मंदिरात केवळ लहान पण सुंदर गाभारा बघायला मिळतो. शिल्पकारांनी अगदी वरपर्यंत सुंदर नक्षीकाम केलेली शिल्प कोरलेली आहेत.
हे मंदिर आवर्जून जाऊन बघावे इतके ते सुंदर आहे. या मंदिरात दोन स्तंभाची मेहरेप आहे. त्यासमोर सुंदर सुशोभित असा नंदीमंडप असून त्यात नंदी विराजमान आहे. प्रतिमांमध्ये श्रीकृष्णलीला,कालियामर्दन, मुष्टीर - चाणुक - बलराम, कृष्ण कुस्ती, पौराणिक शिल्पांसह, भागवतकथा, दशावतार अशा अनेक शिल्पांनीयुक्त हे मंदिर बघितले की थक्क व्हायला होतं. गाभाऱ्यात शिवपिंड असून आज ते मंदिर अर्धवटच राहिलेय हे मात्र खरे आहे.
इ.स. १८१७ साली सीताबर्डीची लढाई झाली. नागपूरचे राजे श्रीमंत अप्पासाहेब भोसलेंना इंग्रजांनी कैद केले व आजच्या मॉरीस कॉलेज जवळ नजरबंद केले. श्रावणात अप्पासाहेबांनी येथे अभिषेक केल्याचे सांगतात. या मंदिरात श्रावणमास, सोमवार, नागपंचमी, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र हे सर्व शिवाविषयक सण-व्रत होतात. मंदिरात भरपूर जागा आहे. असं भोंडा महादेव मंदिर हे मंदिर आवर्जून बघावे असेच आहे.