>> रवींद्र वासुदेव गाडगीळ
लहानपणापासून मनात वसलेली एक कविता श्रावण महिन्याची चाहूल लागताच आबाल-वृद्धांच्या, स्त्री-पुरुषांच्या ओठावर अलगद येते, ती म्हणजे, 'श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहिकडे.'
नुकतीच पेरणी संपल्याने शेतकऱ्याला कामातून सवड मिळते.व्यावहारिक प्रयत्नांना यश मिळावे, ही भावना ठेवून आत्मिक शांतीसाठी पावसाळ्याचे चार महिने तो ईशस्तवनात घालवतो. म्हणूनच श्रावण महिना डवरलेल्या गुलमोहरासारख्या सणांनी नुसता बहरलेला असतो. विविध रंगांची उधळण करून, विविध आकाराच्या पुष्पगुच्छांचे अलंकार लेऊन निसर्ग श्रुंगारलेला असतो. सगळीकडे आनंदी आनंद. धरणीमाता अंगरभर हिरवागार शालू नेसून या आनंदात सामील होते. निसर्गाचं स्वरूप साजश्रुंगारात युवतीप्रमाणे मनाला मोहून टाकते.
श्रावण हा देवधर्म, देशधर्म आणि कृषीधर्माचा महिना. वाण-वैभवाने सृष्टी श्रावणात नटते. हरीभरीत होते. परंतु, वास्तव मात्र वेगळे आहे. ते असे की, दुर्दैवाने मानवी हव्यास आणि आक्रमणामुळे हिरवळ कमी होत आहे. डोंगरदऱ्या उघड्या बोडक्या झाल्या आहेत. नद्या नाले, तलाव, ओढा, झरे कोरडे झाले आहेत. त्यामुळे जमिनीत आणि आकाशात पाणीच नाही. निसर्गाचे सृष्टीचक्र बदलले आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची अत्यावशकता वाढली आहे. त्यासाठी सर्वांनीच परस्पर सहकार्यासाठी कंबर कसली पाहिजे. नुसते, `वृक्षवल्ली आम्हा सोयरे' म्हणून चालणार नाही, तशी कृती करावयास हवी.
श्रावण म्हटला, की सुरुवातीला हमखास आठवतो, तो श्रावणी सोमवार. एकभुक्त उपवास, शिवदर्शन, शिवाभिषेक, रुद्राभिषेक, एकादशणी, लघुरुद्र, सहस्रबेल, शिवपूजन. शिवपूजा ही बघण्यासारखी असते. पुष्परचना सुंदर केलेली असते. वस्रप्रावरण, चांदीचे मुखवटे, पंचामृती स्नान, धूप, दीप, मिठाई, फळं, पक्वान्न अन् शंऽऽऽऽभोऽऽऽ अशी मोठ्याने आरोळी. मग आरती, प्रार्थना, मंत्रपुष्पांजली, अर्धी प्रदक्षिणा, पूर्ण दक्षिणा.
या दिवशी भोपळ्याचे महत्त्व जास्तच! गंगाफळ म्हणतात त्याला. उपास सोडण्यासाठी भोपळ्याची भाजी, भजी, आमटी, भरीत, दशम्या, सालाची चटणी, इ. प्रकार भोपळ्याचेच! दूधा-तुपाची रेलचेल असते. हिरवे हिरवे कोवळे गवत खाऊन धष्ट-पुष्ट झालेल्या गायी-बकऱ्या भरपूर दूध देतात. अर्थात, बोर्नव्हिटा, सूप, टू मिनिट्स, कॉम्पेन, न्यूडल्स, मॅगी खाणाऱ्या पिणाऱ्या बॉईज, गर्ल्सना याची खुमारी कधी आणि कशी कळणार? अशा वाट चुकलेल्या पिढीला आपल्या संस्कृतीकडे पुनश्च वळवणारा असा हा श्रावण!
सोमवारी शिवामूठ, मूग, तांदूळ, तीळ इ. धान्य यथाशक्ती किंवा कमीत कमी मूठभर, मंदिरात वाहतात. त्यात दानाचं महत्त्व आपल्याकडील थोडंसं दुसऱ्याला देण्याचं महत्त्व, जगा आणि जगू द्या, असा संदेश वदवून दिला आहे. थेंबे थेंबे तळे साचे. कहाणीतील म्हातारीने घरच्या सर्वांना तृप्त करून मगच छोटा पेलाभर दूध गाभाऱ्यात ओतून राजाकडून गावभरचे दूध सक्तीने आणि शक्तीने ओतूनही न भरलेला गाभारा क्षणात भरला, हा चमत्कार नसून साक्षात्कार आह़े एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, किंवा गाव करी ते राव काय करी, या म्हणी सार्थ करणाऱ्या त्या घटना आहेत. मंदिराची निगा राखणारे भोपी, गुरव, पुजारी, बेलफुल विकणारी, ब्राह्मण, व्यवस्थापक, सेवक, सफाईवाला, इ. लोकांना त्यांनी केलेल्या सेवेच्या मोबदल्यात मेवा मिळावा, यासाठी हे अल्पसे दान, पुण्य, धर्म! त्यांना त्यादिवशीचे पूर्ण वाढलेले ताट केळीच्या पानावर, नैवेद्य म्हणून नेऊन देतात. हे ताट चारीठाव उजवे-डावे बघून सर्व अद्ययावत पदार्थ त्यात वाढलेले असतात. त्याचा स्वाद आणि तृप्तता अगदी वेगळी असते. आजकालच्या तयार खाद्यपदार्थांच्या जमान्यात अशी तृप्तता मिळणे कठीण आहे.
१७ ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होत आहे. चला तर मग, आपणही या श्रावणात देवधर्म, देशधर्म आणि कृषिधर्माला हातभार लावूया!