यंदा ५ ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरु झाला असून ३ सप्टेंबर रोजी तो पूर्ण होणार आहे. मात्र २ आणि ३ सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या विभागून आल्याने १ सप्टेंबर पर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल. त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही, भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी, गुरुजींकडून कथावाचन ऐकावे. प्रसादाचा नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपणही घ्यावा. पण हा आग्रह कशासाठी, त्याचे लाभ काय, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
आपल्याला आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते. अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे “सत्यनारायण व्रत''. घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक! ह्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते. कुठलेही कल्पविकल्प मनात न ठेवता हे व्रत केले तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवलेला आनंद सर्वांना दिसू लागेल. सत्यनारायण पूजेचा विधी आणि महत्त्व याबद्दल माहिती देत आहेत ज्योतिष अभ्यासक अस्मिता दीक्षित.
उपासना आणि व्रत
विवाह झाल्यावर सत्यनारायण पुजावा आणि मग कुल देवतेचे दर्शन घेवून संसाराला सुरवात करावी अशी रूढी परंपरा आहे. श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्य नारायणाची पूजा केली जाते . मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते, ती विशेषत: श्रावणात केली जाते. श्रावण मास हा पुण्यसंचयाचा. त्यादृष्टीने सत्यनाराण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते. त्यामुळे लाभ काय होतात तेही जाणून घेऊ.
सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरुपातही केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगुन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो असे मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याचीदेखील परंपरा आहे . घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते.
विधी – घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग /पाट मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे. त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा . त्यात पैसा फुल घालावे. त्यावर एक ताम्हन ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे. ह्यात तुळशी पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी . श्रीकृष्णाला १०८, १००८ अशा संख्येत तुळस अर्पण करावी. पूजेत मन एकाग्र व्हावे, त्यासाठी हा मोठा आकडा दिला आहे. तुळस अर्पण करून फुल वाहावीत. केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते, मांगल्य आणि पावित्र्य जाणवते. परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये.
सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थ प्रसाद द्यावा. त्याबरोबर न्याहारीची डिश, पेय, सरबतं या ऐच्छिक बाबी आहेत. त्यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा आणि सत्यनारायण पुजेहा आनंद घ्यावा. श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध, अक्षता फुलं आणि तुळस अर्पण करावे.
आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी .धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे. सत्यनारायण व्रत पोथी मिळते (संपूर्ण चातुर्मास ह्यातसुद्धा आहे ) त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे . आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा, त्यात केळे घालावे. त्या दिवशी घरात जो काही स्वयपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा. तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी लागावा, जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली कि मूर्तीवर अक्षता वाहून “ पुनरागमनायच “ असे ३ वेळा म्हणावे आणि श्री कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा.
हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे. वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेख / गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची , उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही .कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होयील हे ध्यानी असुदे. नाहीतर कर्णोपकर्णी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ पदरात पडणार नाही. त्यात सातत्य ठेवावे.
उपासनेचे महत्व अनन्यसाधारण आहे . त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य, प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते .फक्त त्यात समर्पणाची भावना हवी. साधेपणा हवा. अहंकाराचा लवलेशही नको. तरच ती पूजा फलद्रुप होईल.