श्रावणमासात श्रावणसरी बरसू लागल्या आणि त्यात सुटीचा दिवस असला, की अंथरूण सोडून उठणे फार जीवावर येते. परंतु आळस झटका आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाचे आनंदाने स्वागत करा, हा संस्कार घालणारी आपली संस्कृती.म्हणून दर दिवशी उत्सवाप्रमाणे प्रकाशमान करणाऱ्या सूर्यदेवाची श्रावणातल्या रविवारी (Shravan Raviwar 2023) पूजा करावी असा शास्त्रसंकेत आहे. या पूजेसाठी फार वेळ लागणार नाही की वेगळा खर्चही करावा लागणार नाही. फक्त झोपमोड करून सूर्योदयाआधी उठायची तयारी हवी. पूजेचे फळ लवकरच मिळेल. २७ ऑगस्ट रोजी श्रावणातला आदित्य पूजनाचा (Aaditya Pujan 2023) दिवस आहे. त्याचे महत्त्व आणि पूजाविधी समजून घेऊ.
धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला जल दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणे पाप आहे. आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगत असत, 'लवकर निजे लवकर उठे, त्यासी आयुरारोग्य लाभे!' ही सवय अंगी बाणावी यासाठी सूर्य नमस्कार आणि सूर्याला अर्घ्य देणे या दोन गोष्टींचा शास्त्रात समावेश करण्यात आला. सूर्योदयापूर्वी उठून सूर्याचे स्वागत करावे आणि त्याला अर्घ्य द्यावे, असा संस्कार हिंदू धर्म शास्त्रात दिला आहे. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे स्वागत करण्याऐवजी झोपून राहणे हा त्याचा अपमान आहे. याउलट लवकर उठून सूर्य दर्शन घेणे आणि अर्घ्य देऊन त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा संस्कार आहे. अलंकारित भाषेमध्ये वेद म्हणतात, की संध्यासमयी सूर्याला दिलेले अर्घ्य जल वज्र बनून असुरांचा नाश करते. विज्ञानाच्या दृष्टीने असूर कोणते, तर पुढीलप्रमाणे-
मनुष्याला त्रास देणारे असूर आहेत, टायफाईड, निमोनिया इ रोग ज्यांना नष्ट करण्याची दिव्यशक्ती सूर्यकिरणांमध्ये असते. एन्थ्रेक्सचे किटाणू जे खूप वर्षाचे शुष्कीकरणामुळे मरत नाहीत ते सूर्य किरणाच्या एक दीड तासातच मरतात. उकळत्या पाण्याने मरत नाहीत. परंतु सूर्याच्या प्रभातकालीन साधकांवर सूर्यकिरणे सरळ पडतात.
अर्घ्य कसे देतात - तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात लाल फुलं, अक्षता आणि कुंकू घालावे. ते पाणी हात उंचावून सूर्याला अर्पण करावे. राहत्या वस्तीत, इमारतीत सूर्याला अशाप्रकारे अर्घ्य देणे शक्य नसल्यास ताम्हन घेऊन पळीत पाणी घेऊन सूर्याकडे बघत ते पाणी डाव्या हाताने उजव्या हातावर सोडून अर्घ्य द्यावे. नंतर ताम्हनातले पाणी तुळशीला किंवा अन्य झाडांना घालावे.
अर्घ्य देताना म्हणावयाचा मंत्र -
एहि सूर्य! सहस्त्रांशो! तेजो राशे! जगत्पते!अनुकम्प्यं मां भक्त्या गृहाणार्घ्य दिवाकर!
अर्थ : हे सूर्य देवता, तुझ्यासारखे तेज आम्हाला दे आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टी कायम असू दे.
त्याचबरोबर सूर्याची बारा नावे घेत सूर्यनमस्कार घातल्यास आरोग्य उत्तम राहते आणि शरीर सुदृढ बनते. म्हणून रोज सकाळी सूर्याची उपासना करा. तुम्हाला पाहून घरातली लहान मुलेसुद्धा तुमचे निश्चितच अनुकरण करतील.
शास्त्रानुसार प्रात:काळात पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी पश्चिमेला तोंड करून पाणी दिले पाहिजे. पाण्याचा गडू छातीबरोबर उंच ठेवून पाणी सोडावे आणि गडूचा उभा भाग तोपर्यंत पाहत राहा जोपर्यंत पाणी समाप्त होत नाही. असे केल्याने डोळ्यात मोतिबिंदू होत नाही असे म्हणतात.
असे हे व्रताचरण श्रावण मासात सुरू केले तरी दीर्घकाळ सातत्याने करा, त्याचा निश्चितच लाभ होईल!