पितृदोष हा कुंडलीतील एक दोष मानला जातो. कुंडलीतील इतर दोषांप्रमाणे या दोषाचे निराकरण केले पाहिजे, असे ज्योतिषशास्त्र सांगते. हे दोष आपल्याकडून चुका घडल्या म्हणून निर्माण होत नाहीत, तर आपल्या जन्माबरोबर ते प्रारब्धाचा एक भाग बनून चिकटतात. २७ जुलै रोजी श्रावण अमावस्या (Shravan Amavasya 2022)आहे त्यानिमित्ताने या विषयाबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
कुंडलीत पितृदोष कसा ओळखावा?
पितृदोष या शब्दावरून लक्षात येते, की या दोषाचा संबंध पितरांशी आहे. पूर्वजांना झालेला त्रास, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा यामुळे पितृदोष निर्माण होतो. पितरांच्या वंशात जन्मलेल्या एखाद्या बालकाच्या वाट्याला हा दोष येतो. त्यावर विधिवत उपाय करून त्याने तो पितृदोष दूर करावा आणि पितरांना शांत करावे, यालाच पितृ दोष निवारण करणे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीचे कुंडलीतील भाग्यस्थान पापी ग्रहांनी पीडित असेल, तर ते पितरांची नाराजी आणि अतृप्त इच्छा दर्शवते. याशिवाय रवि आणि चंद्र जर राहू किंवा केतूने त्रस्त असतील तरीदेखील ती स्थिती पितृदोष दर्शवते. हा झाला ज्योतिषशास्त्राचा भाग. त्यावर काय उपाय करता येईल ते जाणून घेऊ.
पितृदोष दूर करण्याचे उपाय:
पितृदोष दूर करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या सोयीनुसार त्या उपायांचे पालन केल्याने पितृदोष दूर करून पितरांचे आशीर्वाद मिळू शकतात. पितृ दोषाचा प्रभाव कमी करणारे उपाय पुढीलप्रमाणे-
>>सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. नंतर भगवान विष्णूंच्या नावाने एक जानवे झाडाजवळ अर्पण करावे . मग त्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर जाणते अजाणतेपणी झालेल्या अपराधांची क्षमा करण्यासाठी पिंपळाच्या वृक्षाला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करा. सोमवती अमावस्येला हा प्रयोग केल्यास लवकरच चांगले फळ मिळू लागते.
>>दर शनिवारी कावळ्यांना आणि माशांना खाद्य घाला, तसेच तांदळाच्या पिठाचे लाडू गोरगरिबांना दान करा.
>>रोज एकदा 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करावा, शक्य असल्यास सोमवारचा उपास करावा.
>>सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या दिवशी तसेच अमावस्येला गरजूंना धान्यदान करावे, असे केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते.
>>पुष्य नक्षत्रावर महादेवाला पाणी आणि दूध अर्पण करा तसेच रुद्र जप करत शिवपिंडीला अभिषेक करा.
>>ज्यांना पितृदोष असतो अशा लोकांनी आपल्या पूर्वजांचे मासिक किंवा वार्षिक श्राद्ध अवश्य करावे. यात पितरांना नैवेद्य दाखवून आपली पितृदोषातून सुटका करण्याची विनंती करावी.
>>काशी, त्र्यंबकेश्वर, प्रयाग, गया अशा तीर्थक्षेत्री गेल्यास पितृकर्म अवश्य करावे.