श्रावण अमावस्येला आपण 'मातृदिन' साजरा करतो. यंदा गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी मातृदिन आहे. काही जणांना पाश्चात्यांच्या 'मदर्स डे' या संकल्पनेवरून मातृदिन हा सण घेतला आहे असे वाटते. परंतु तसे नसून ही प्रथा अतिप्राचीन आहे. आपल्याकडे जन्मदात्या आई वडिलांना देवापेक्षाही मोठे स्थान दिले गेले आहे. 'मातृदेवो भव', 'पितृदेवो भव' हा संस्कार पूर्वापार चालत आला आहे. अशा आपल्या जन्मदात्रीप्रती कृतज्ञता म्हणून श्रावण अमावस्येला `मातृदिन' साजरा केला जातो.
आपल्याकडे माता पित्यांची आज्ञा पाळणाऱ्या, त्यांच्यासाठी सर्व सुखांचा प्रसंगी जिवाचा त्याग करणाऱ्या व्यक्तींकडे आदर्श आणि आदरणीय म्हणून पाहिले जाते. सावत्र आई कैकयीची आज्ञा आणि वडिलांची तिला दिलेल्या वचनांची पूर्ती व्हावी म्हणून प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवान स्वत:हून स्वीकारला होता. अंध माता पित्यांना कावडीत बसवून श्रावणबाळाने तीर्थयात्रा घडवली. भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत असताना पांडुरंग आले, तरी अर्धवट सेवेतून उठला नाही. तर पांडुरंगाला थोड्यावेळ थांब म्हणवून विनवणी केली. वडिलांच्या सुखासाठी आणि सावत्र आईचा संशय दूर करण्यासाठी देवव्रताने भीष्मप्रतिज्ञा केली. अशी असंख्य उदाहरणे संस्कृतीच्या विशाल पूर्वइतिहासात सापडतात.
आजच्या काळात आई आणि मुलांचे नाते दुरावत चालले आहे. मदर्स डे उत्साहात साजरा करणारी मुलं आईबरोबर सेल्फी काढून सोशल मिडीयावर झळकतात. तिथल्या कमेंटला रिप्लाय देतात, परंतु आईशी दोन शब्दही बोलत नाहीत, ही घरोघरी असलेल्या आईची व्यथा आहे. ज्यांनी जन्म दिला त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहिले पाहिजे आणि प्रत्येक दिवस हा मातृ पितृ दिन म्हणून साजरा केला पाहिजे, याची जाणीव करून देण्यासाठी हे निमित्त आहे.
या दिनाचे महत्त्व जाणून घेत आपणही आपल्या आई-वडिलांचा आदर कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांनी आपला सांभाळ केला, तसा आपण त्यांच्या उतारवयात सांभाळ केला पाहिजे. या सर्व जबाबदारींची जाणीव करून घेत मातृदिन साजरा केला पाहिजे. आजच्या दिवशी पिठोरी अमावस्येचे व्रत केले जाते. समस्त माता हे व्रत आपल्या लेकरांना सुदृढ, निरोगी दीर्घायुष्य मिळावे म्हणून करतात. जर आई मुलांसाठी व्रत करू शकते, तर आपणही तिच्याशी चांगले वागून, काळजी घेऊन, प्रेम देऊन मातृदिन साजरा करायला हवा ना...?
फोटो स्रोत : गुगल