ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांच्या कुळात आपण वाढलो, ज्यांची परंपरा आणि नाव आपण पुढे नेत आहोत अशा आपल्या कुळातील दिवंगत व्यक्तींचा अर्थात पितरांचा सदैव आदर करावा. शक्य तेवढी सेवा करावी आणि दर अमावस्येला त्यांच्या नावे पूजन करावे, स्मरण करावे आणि मनोमन त्यांना वंदन करावे. त्यांच्यानावे दानधर्म केल्यास पुण्य लाभते आणि त्यांचा आशीर्वाद पुढच्या पिढ्यांनाही लाभतो.
>> धर्मशास्त्राने माता-पिता, गुरुजन, आप्तस्वकीय यांना मान द्यावा हा संस्कार तर घातला आहेच, परंतु त्यांच्या मृत्यूपश्चात आत्म्याला सद्गती मिळावी आणि त्यांचे ऋणात कायम कृतज्ञ राहावे, या भावनेने पितरांची सेवा सांगितली आहे. तसेच पितरांची सेवा करण्यामागे अनेक कारणेही दिली आहेत.
Shravan Amavasya 2024: पिठोरी अमावस्येला मातृदिन का म्हणतात? जाणून घ्या कारण!
>> पितरांची सेवा केल्याने त्यांचे पितृलोकात गमन होते आणि सेवा करणाऱ्या मनुष्याचे जीवन सुखी आणि समृद्ध होऊन ज्यांना संतान नाही त्यांना संतान प्राप्ती होते.
>> घरात नेहमी वातावरण तंग राहत असल्यास, घरात सतत भांडण, तंटा, कटकटी होत असल्यास यापैकी कोणत्याही कारणाने घरातील सदस्याचे मन अस्वस्थ, बेचैन होत असल्यास पितरांची सेवा केल्याने घरातील वातावरण सुधारून प्रसन्न वाटते.
>> मुलांचे आईवडिलांशी वारंवार खटके उडत असल्यास, पती पत्नीमध्ये विकोपाची भांडणे होत असल्यास पितरांची सेवा केल्याने भांडणे वादविवाद कमी होतो व कुटुंबात सौख्य नांदते.
>> घरात सतत आजारपण येत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने आर्थिक अडचणी निर्माण होत असल्या पितरांच्या सेवेने आरोग्य उत्तम लाभून आयुष्य वृद्धी वाढते.
>> पितरांच्या सेवेने समाजातील सर्व लोकांशी संबंध सुधारतात. कोणाकडून फसवणूक होत नाही. शेती, व्यवसाय, नोकरी संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारून प्रगतीतील अडथळे दूर होतात.
>> पितरांच्या सेवेने स्थावर मालमत्ता, संपत्ती यांचा लाभ होऊन कुटुंबास मनस्वास्थ्य लाभते व आत्मविश्वास वाढतो.
>> बाहेरील बाधांचा, हितशत्रूंचा उपद्रव होत नाही. अकाली मृत्यू टळतो.
थोडक्यात काय, तर आत्मा संतुष्ट तर परमात्मा आणि अंतरात्माही समाधान पावतो. आज श्रावण अमावस्या (Shravan Amavasya 2024) आहे. वरील मुद्दे लक्षात घेता आपल्या पितरांच्या सेवेची संधी दवडू नका तसेच केवळ दिवंगत पितरांचीच नाही, तर जिवंत माता पित्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारची उणीव ठेवू नका.