श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाला राजा दशरथाने हरीण समजून मारले, त्या अचानक उद्भवलेल्या आपत्तीने आणि पुत्राच्या वियोगाने श्रावणबाळाच्या आईवडिलांना शोक अनावर झाला. दशरथाने त्यांचे सांत्वन केले आणि आपल्या हातून नकळत घडलेल्या अपराधाची क्षमा मागितली. श्रावण गेला हे ऐकून त्या माउलीने प्राण सोडले तर श्रावणाच्या पित्याने राजा दशरथाला शाप दिला, 'तू सुद्धा आमच्यासारखाच पुत्र वियोगाने मरशील!' राजाच्या हातून अपराध घडला होता म्हणून त्या घटनेचं परिमार्जन म्हणून त्याने आपल्या राज्यात सर्वांना श्रावण पूजेचा आग्रह धरला. तेव्हापासून श्रावण पौर्णिमेला श्रावण बाळाचे स्मरण करून पूजा केली जाते.
ही होती श्रावण पौर्णिमेची अप्रिय आठवण आणि चांगली आठवण सांगायची तर हाच शाप राजा दशरथासाठी वरदान ठरले. राजाला चार राण्या असूनही संतानप्राप्ती झाली नव्हती. कोसल देशातील अयोध्या नगरीला उत्तराधिकारी नव्हता. आपल्या हातून नकळत घडलेल्या पापाची राजाने गुरु वसिष्ठांसमोर जेव्हा कबुली दिली, तेव्हा गुरुंनी राजाला दिलासा देत म्हटले, 'राजा तुझ्या हातून पातक घडले आहे यात शंका नाही, परंतु हा शाप तुझ्यासाठी वरदान ठरणार आहे. त्यांनी तुला पुत्रवियोगाचा शाप दिला आहे, त्याअर्थी तू निपुत्रिक राहणार नाहीस तर तुला संतानप्राप्ती होणार आहे. भेटी गाठी झाल्यावर वियोगाचे दुःख कधी न कधी येणारच. त्यामुळे श्रावण बाळाचे व त्याच्या माता पित्यांचे विधिवत अंत्य संस्कार करून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वहा आणि पुत्र प्राप्तीचे वरदान फलद्रूप होण्यासाठी पुत्रकामेष्टी कर.
राजाने गुरुंचे वचन प्रमाण मानून यज्ञ केला. त्या यज्ञातून अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रसादरूपी पायसपात्र राजाला सोपवून त्याच्या तिन्ही राण्यांना देण्यास सांगितले. तो प्रसाद कौसल्या, सुमित्रा, कैकयी ने ग्रहण केला. यथावकाश त्यांना मुले झाली. त्या मुलांनी धर्म कार्यार्थ आपले आयुष्य वेचले आणि बंधू प्रेमाचा आदर्श जगाला घालून दिला. ती मुले होती - श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न!
या दोन्ही कथा पाहता श्रावणी पौर्णिमेचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कायम स्मरणात राहील.