श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृदधी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. जसे की नारळी पौर्णिमा! समुद्राचा सन्मान म्हणून नारळ अर्पण केला जातो. त्याच्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.
श्रीफळ म्हणजे नारळ. हे शुभनिदर्शक फळ असून ते सृजनशक्तीचे फळ मानलेले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. लक्ष्मीला नारळ फार आवडतो म्हणून याला श्रीफळ हे बहुमानाचे व आदराचे नाव प्राप्त झाले. हिंदू धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नारळाला अनिवार्य असे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मंगल कार्यारंभी इष्ट देवापुढे पानाचा विडा, सुपारी व नारळ ठेवण्याची प्रथा आहे. नारळ हे महाफळ म्हणून देवाला अर्पण करतात. शुभकार्याप्रसंगी घराच्या दारावर जे तोरण बांधतात, त्यात मध्यभागी नारळ गुंफतात.
नववधू माहेरवाशीण सासरी जायला निघाली की असोला म्हणजे न सोललेला नारळ देण्याची पूर्वी प्रथा होती. हा नारळ नववधूच्या हस्ते रुजत घालीत. नववधूला संततीप्राप्तीचे सुख लाभावे, ही त्यामागची कल्पना होती. यावरुन अपत्यहीन स्त्री आपल्या इष्ट देवतेला नारळाचे तोरण बांधण्याचा नवस बोलत असते. नवजात बालकाच्या नामकरणप्रसंगी नारळाची कुंची (इरल्याच्या आकाराची लहान मुलाची टोपी) घालून प्रथम पाळण्यात घालतात आणि मग मुलाला पाळण्यात ठेवतात. नारळ हे भावी अपत्याचे प्रतीक असल्याने नववधूंची आणि सुवासिनींची ओटी नारळाने भरतात.
धार्मिक विधीप्रसंगी कलस प्रतिष्ठापित करतात, त्या वेळी कलशावर पूर्णपात्र ठेवायचे नसल्यास नारळ ठेवतात. मंदिराच्या कळसावरही सर्वोच्च ठिकाणी नारळाची प्रतिकृती घडवतात. श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात. सागरकिनारी वास्तव्य करणारे लोक व कोळीबांधव महासागराला नारळ अर्पण करून जलदेवतेचे पूजन करतात. तसेच या दिवशी नारळी भात किंवा खोबरेपाक या गोड पदार्थांना विशेष महत्त्व असते!
महाबली मारुती, शक्तिदेवता, इष्टदेवता व ग्रामदेवता यांच्यापुढे नारळ फोडण्याची परंपरागत प्रथा आहे. अमावस्या व पौर्णिमेस कुलदैवत, जागृत देवस्थान तसेच भूमीच्या, घराच्या संरक्षणकशक्तीला प्रसन्न करून अनिष्ट घटना घडू नये, या उद्देशाने नारळ देतात. हा प्राचीन नरबळीचा पर्याय आहे असे संशोधकांचे मत आहे. नरबलीच्या अघोरी प्रथेत बळीचे शरीर देवापुढे ठेवत असत. नरबली प्रथा बंद झाल्यावर त्याऐवजी पूर्ण नारळ किंवा तो फोडून त्याची शकले देवापुढे ठेवण्याची प्रथा पडली.
नारळाला ब्राह्मण मानण्याचा एक संकेत आहे. म्हणून नारळ फोडतेवेळी त्याची संपूर्ण शेंडी काढून शिखानष्ट करू नये. शेंडीसकट नारळ हा नरमुंडाचा प्रतिनिधी आहे.
जलाने पूर्ण भरलेला कलश घेऊन त्यावर पाने, फुले, फुलवीत नारळ ठेवून पूजेला आसनस्थ व्हायचे असते. नारळात जसे पाणी असते, तसेच आपल्या मनातही ओलावा असावा ही त्यामागची विशुद्ध भावना आहे. नारळ हा सद्भावना, सत्प्रवृत्तीचे प्रतीक म्हणून नारळाची पूजा करतात. याचा कोणताही भाग वाया जात नसल्यामुळे दक्षिण हिंदुस्थानात लोक `हरा सोना' म्हणतात. इतरत्र नारळाला कामधेनू म्हणतात तर कोकणवासीय नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे कुणालाही देताना तो शेंडीची बाजू पुढे करून लाल कुंकू लावून देण्याची प्रथा आहे.
नारळ मानवाला चारित्र्यपूजनाची प्रेरणा देतो म्हणूनच श्रीफळ हे मनुष्य जीवनाचे व मनाच्या वैभवाचे प्रतीक आहे. अशा अनेक भावरुपांनी भारतीय मनाशी नाते जडलेला नारळ भारतीयांच्या जीवनाशी एकरूप झालेला आहे.