Shravan Shanivar Ashvattha Maruti Narasimha Pujan 2024: श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व असून, प्रत्येक दिवसाला केल्या जाणाऱ्या व्रतांचे विशेष महत्त्व आहे. १० ऑगस्ट २०२४ रोजी पहिला श्रावणी शनिवार आहे. या दिवशी अश्वत्थ मारुती आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आहे. याविषयी जाणून घेऊया...
चातुर्मासात श्रावण मासाचे महात्म्य वेगळे आहे. श्रावणात अनेक घरांमध्ये जिवतीचा कागद लावला जातो. या जिवतीच्या कागदातील प्रत्येक देवतेचे वेगळे महत्त्व आहे. या जिवतीच्या कागदात वरती सर्वांत पहिल्यांदा नृसिंह देवांचा फोटो आहे. याच नृसिंहाचे पूजन श्रावणी शनिवारी केले जाते. तसेच अश्वत्थ मारुती पूजन करण्याची परंपराही प्रचलित आहे. अश्वत्थ मारुती व्रताची कथा पद्मपुराणात आढळून येते.
अश्वत्थ वृक्ष पूजनीय
शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो, असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई. उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले.
शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. षोडषोपचार पूजन करावे. हनुमंताला आवडणारा नैवेद्य दाखवावा. धूप, दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंतांचे घरच्या घरी पूजन, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.
नृसिंह अवताराचे महत्त्व
प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह वा नृसिंह देवतेचे पूजन केले जाते. उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी यांसारख्या संकटांपासून नरसिंह देवता घरातील बाळाचा बचाव करतात, अशी मान्यता आहे. तसेच नृसिंह अवतार खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते. प्रल्हादाच्या जीवनाशी निगडित ‘होळी’ जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते, तशीच ही पूजादेखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी, असे सांगितले जाते.
श्रावणी शनिवारी नृसिंह पूजन
श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. चित्र काढणे शक्य नसेल, तर प्रतिमा वापरावी. चित्र काढल्यास त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी, असा नैवेद्य दाखवावा. सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितले जावे, असे सांगितले जाते.