Shravan Shaniwar Shani Pradosh Vrat 2024: व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल असलेला चातुर्मासातील सर्वाधिक महत्त्वाचा श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील व्रत-वैकल्यांचे वैशिष्ट्य, वेगळेपण अनन्य साधारण आहे. श्रावण हा शिवपूजनासाठीही सर्वोत्तम मानला जातो. या काळात आवर्जून महादेवांशी संबंधित रुद्राभिषेक, जलाभिषेक, विविध व्रते केली जातात. १७ ऑगस्ट रोजी शनिप्रदोष व्रत आहे. शनिप्रदोष व्रत म्हणजे काय? शनिप्रदोष व्रत कसे करावे? शनिप्रदोष व्रतात शिवपूजनाचे महत्त्व काय? ते जाणून घेऊया...
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते. हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत तिथी शनिवारी येते तेव्हा त्याला शनिप्रदोष व्रत म्हणतात. शनिप्रदोष व्रत महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी एक विशेष व्रत मानले जाते. शनिवार, १७ ऑगस्ट २०२४ रोजी शनिप्रदोष आहे.
साडेसाती सुरू असलेल्यांनी आवर्जून करावे शनिप्रदोष व्रत
काही मान्यतांनुसार, शनी देव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनीदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. शनिप्रदोष व्रत केल्यास समस्या, संकटे दूर होऊ शकतात. शनिदेवाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती मिळू शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन या राशींची साडेसाती सुरू आहे. ज्या राशींची साडेसाती सुरू आहे, त्या व्यक्तींनी आवर्जून हे व्रत करावे, असा सल्लाही दिला जातो.
कसे करावे शनिप्रदोष व्रत?
प्रदोष व्रत प्रामुख्याने तिन्हीसांजेला दिवेलागणीला केले जाते. या प्रदोष काळात शिवपूजन केले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. शिवपूजन झाल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी, शनि चालिसा पठण करावी. पठण करणे शक्य नसल्यास श्रवण करावी. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते. भगवान शंकराची कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शनी देवाचे पूजन करण्यासह शनीदेवाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे पठण करणे अतिशय शुभ मानले जाते.
साडेसाती सुरू असलेल्यांनी काही गोष्टी अवश्य कराव्यात
मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. साडेसाती सुरू असलेल्यांनी शनिप्रदोष काळात काही गोष्टी अवश्य कराव्यात, असे सांगितले जाते. शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवांच्या शिवलिंगावर १०८ बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. शनिवारी हे करणे शुभ मानले जाते. यासोबतच यथाशक्ती अन्नदान, शनीशी निगडीत वस्तुंचे दान करावे. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मूळाशी पाणी आणि दूध अर्पण करावे. शक्य असल्यास पाच प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. पितरांचे स्मरण करून पिंपळाचे पूजन करावे. पिंपळाला प्रदक्षिणा घालून मनोभावे नमस्कार करावा. यानंतर हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे याच महिन्यातील शेवटच्या शनिवारी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी शनिप्रदोष आहे.