प्रत्येकजण संपत्ती आणि समृध्दीसाठी इच्छा धरतो. यासाठी लोक अनेक प्रकारचे व्रत आणि नवस देखील करतात, परंतु असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे देवी लक्ष्मीची कृपा सहज मिळू शकते. यासाठी श्रावणी शुक्रवारचा दिवस विशेष आहे कारण हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना केल्यास आर्थिक त्रास दूर होतो आणि संपत्ती व समृध्दी मिळते. यासाठी दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी वरदलक्ष्मीच्या निमित्ताने करा देवीची उपासना!
देवीला लाल वस्त्र अर्पण करा: लाल रंग देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे, म्हणून शुक्रवारी माता महालक्ष्मीच्या मंदिरात जा आणि तिला लाल वस्त्र अर्पण करा. यासह देवीला खणा-नारळाची ओटी भरा, तसेच एखाद्या सौभाग्यवतीची ओटी भरून तिला जेवू घाला. एखाद्या गरीब स्त्रीला वस्त्रदान करा. या उपायांनी पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.
पूजेमध्ये लाल फुलांचा वापर करा: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी शुक्रवारी पूजा करताना आपल्या हातात लाल रंगाची पाच फुले घ्या आणि देवीचे कोणतेही स्तोत्र, श्लोक मनोभावे म्हणा. आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी देवीची करुणा भाका आणि श्रद्धापूर्वक, ही फुले आपल्या कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा.
श्री लक्ष्मी नारायण स्तोत्र वाचा: हे स्तोत्र वाचल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि नित्य उपासना आणि प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला धन आणि कीर्ती मिळते. या स्तोत्राची अनुभूती येऊन इच्छित मनोकामना पूर्ण झाल्यास देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद कुमारिकांना द्यावा.
तांदळाची पुडी तिजोरीत ठेवा: धनवृद्धीसाठी आणखी एक उपाय सांगितला जातो. तो म्हणजे दर शुक्रवारी लाल कपडा घ्या आणि त्यात मूठभर तांदूळ घ्या. आणि त्या कापडाची पुरचुंडी बांधून ती तिजोरीत ठेवा. धन धान्य हे देखील वैभवाचे लक्षण आहे. धान्याच्या बरोबर धनाचीही वृद्धी व्हावी अशी त्यामागील संकल्पना आहे.
या सर्व उपायांबरोबरच मुख्य गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे लक्ष्मी केवळ कष्ट करणाऱ्या लोकांवर प्रसन्न होते. आळसी, सुस्त बसून राहणाऱ्या लोकांकडे लक्ष्मी थांबत नाही ती दुसऱ्याकडे निघून जाते. लक्ष्मी मातेला कष्टकरी लोकच आवडतात, त्यांच्यावर तिचा वरद हस्त कायम राहतो. चांगल्या मार्गाने आलेली लक्ष्मी वाढत राहते तर वाईट मार्गाने आलेली लक्ष्मी आहे तेही घेऊन जाते. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी नेहमी सन्मार्गाचाच वापर करावा.