Shravan Shukrawar Jara Jivantika Vrat Jivati Puja 2024: श्रावण महिना सुरू झाला, की देवघराजवळ जिवतीचा किंवा जीवंतिकेचा कागद चिकटविला जातो. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे. श्रावण सगळ्या सृष्टीचे सौंदर्य ओंजळीत घेऊन येतो. अशा श्रावणातल्या निसर्गाने ओंजळीत न मावेल इतके दिल्यावर ते उत्साहाने इतरांशी वाटून घ्यावे, हा संदेश देण्यासाठीच श्रावणातील सण आणि व्रतवैकल्ये साजरी केली जातात. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जरा-जिवंतिका व्रत म्हणजेच जिवतीची पूजा केली जाते. आईने मुलांसाठी करावयाचे हे व्रत असल्याचे सांगितले जाते. श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी जिवतीची पूजा कशी करावी? जाणून घेऊया...
श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जिवतीचे चित्र लावून गंध, हळदकुंकू, फुले, आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात. हळद कुंकू वाहून दूध, साखर व फुटाणे प्रसाद म्हणून देतात. प्रत्येक शुक्रवारी मुठीचे पुरण घालतात. एका शुक्रवारी सवाष्ण जेवायला घालतात व तिला पुरणपोळीचे भोजन वाढून दक्षिणा देतात. मानवी देहाला अन्नमय, मनोमय, प्राणमय, ज्ञानमय, विज्ञानमय, कारणमय आणि आनंदमय हे सात कोश आणि स्थूल देहाचे अर्भक, शिशू, बाल, पौगंड, तरुण, प्रौढ आणि वृद्ध या सात अवस्था आहेत. जीवंतिका या देवता त्या सप्तकोशांचे प्रतीक असून सात बाळे ही त्या अवस्थांची प्रतिके आहेत. (Jivati Puja Vidhi)
हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर
जिवतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती करतात. त्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण करावे. मुले परगावी असतील तर चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्या आणि ‘हे जिवंतिके, माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचे रक्षण कर’, अशी प्रार्थना केली जाते. जिवंतिका व्रत हे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरण्यात येते. श्रावणातील सर्व शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. यासह २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र घालावे. गंध, अक्षता वाहाव्यात. धूप, दीप अर्पण करावे. साखरेचा, चणे-फुटाण्यांचा आणि पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आरती करावी. त्या दिवशी देवीची ओटी भरावी. (Jivati Puja Vrat Katha Kahani)
जिवतीची कहाणी
जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली, अशी एक कथा पुराणात आढळून येते. (Jivati Puja Aarti)
जिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी ।सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।श्रावण येतांचि आणूं प्रतिमा । गृहांत स्थापूनि करू पूजना ।आघाडा दुर्वा माळा वाहूंया । अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। १ ।।
पुरणपोळीचा नैवेद्य दावूं । सुवासिनींना भोजन देऊं ।चणे हळदीकुंकू दूधहि देऊं । जमूनि आनंदे आरती गाऊं ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। २ ।।
सटवीची बाधा होई बाळांना । सोडवी तींतून तूचि तयांना ।माता यां तुजला करिती प्रार्थना । पूर्ण ही करी मनोकामना ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ३ ।।
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे । वंशाचा वेल नीट वाढूं दे ।सेवा हे व्रत नित्य घडूं दे । मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।जयदेवी जयदेवी जय जिवती जननी । सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।। ४ ।।