श्रावणातल्या शुक्रवारी जिवती मातेची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवला जातो. सवाष्णींची ओटी भरली जाते. पाहुणचार केला जातो. या सोपस्काराबरोबर कुमारिका पूजनही केले जाते. शुक्रवार हा देवीचा वार आणि अष्टमी ही देवीची आवडती तिथी असल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी या दोन्ही गोष्टी जुळून आल्याने कुमारिका पूजन करणे इष्ट ठरेल.
कुमारिकांना देवीचे रूप मानले जाते. अष्टमीच्या तिथीला किंवा कोणत्याही श्रावण शुक्रवारी कुमारिकांना घरी आमंत्रण देऊन त्यांची पूजा केली जाते. या पूजेत देवीस्वरूप असलेल्या मुलींचे प्रथम पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. त्यांना गजरा किंवा फुल देऊन स्वागत केले जाते. त्यानंतर मुलींना आवडेल अशी भेटवस्तू देऊन सत्कार केला जातो आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जातात.
कुमारिकेचीच पूजा का?
देवी भागवतात म्हटले आहे, की दोन ते दहा वर्षांच्या मुलींना अर्थात वयात न आलेल्या मुलींना कुमारिका म्हणून बोलवावे. तीन वर्षाच्या मुलीला त्रिमुर्ती, चार वर्षाच्या मुलीला कल्याणी, पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी, सहा वर्षाच्या मुलीला कालिका, आठ वर्षांच्या मुलीला शांभवी, नऊ वर्षांच्या मुलीला दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा असे नवकन्यारूप मानले जाते. वयात आल्यानंतर मुलींमध्ये राग, लोभ, विकार, वासना यांची वृद्धी होऊ लागते. परंतु कुमारिका अल्लड, निरागस आणि निर्विकार असतात. बालरूपात आपण देव पाहतो. म्हणून कुमारिकांना पूजेचा मान दिला जाता़े कुमारिका पूजनाने धन, दीर्घायुषय, बळ वृद्धिंगत होते. तसेच त्यांच्या शुभाशिर्वादाने घरात सुख, समृद्धी, शांती येते.
दहा वर्षांपर्यंतच्या कुमारिकांना आपण कुमारिका पूजनासाठी बोलावतो. तान्ह्या बाळापासून दहा वर्षांच्या कुमारिकेपर्यंत देवीच्या कन्या रूपाची पूजा केली जाते. त्याचे फलित काय मिळते तेही जाणून घेऊ.
दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं.तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुख-समृद्धी नांदते.चार वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं.पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते.सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते.सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते.आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होते.नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असते. ही शत्रूंचा नाश करते.दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
अशा प्रथांच्या निमित्ताने एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा मान राखणे आणि प्रत्येक वयोगटातील स्त्रीला शक्तीरूप समजून तिची पूजा करणे हाच मुख्य हेतू असतो.