यंदा २९ जुलै पासून आपल्या सर्वांचा आवडता आणि सर्व सणउत्सवांचा राजा श्रावण सुरू झाला. हा श्रावण केवळ आपल्यालाच नाही, तर भगवान शंकरालाही प्रिय आहे. म्हणून या मासात शिवपूजेला अधिक महत्त्व दिले गेले आहे. तसेच चातुर्मासात भगवान विष्णू विश्रांती करत असताना त्यांचा कार्यभार महादेव सांभाळतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठीदेखील शिवपूजा केली जाते.
शिवशंकर हे अनेकांचे कुलदैवत आहे. सदाशिव, सांब, महादेव, महेश, मंगेश, शंकर, गिरिजापती, पार्वतीपती अशी अनेक नावे त्यांना आहेत. भारतात बारा ज्योतिर्लिंगे तर प्रसिद्ध आहेच, पण त्याशिवाय सासवडचा कऱ्हेश्वर-वटेश्वर, कोकणातील वेळणेश्वर-कुणकेश्वर, गोव्यातील मंगेश, मध्यप्रदेशातील भगवान एकलिंगजी अशी अनेक जुनी शिवलिंगे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. शिवाचे भक्त अर्थात शैव सांप्रदायिक केवळ श्रावणातच नाही, तर वर्षभर शिवपूजा करतात.
महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, त्रिपुरी पौर्णिमा या दिवसात तर प्रत्येक घरातून शिवपूजा केली जाते. या दिवशी बिल्व पत्रे, दूधाचा अभिषेक केला जातो. दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवून उपास सोडला जातो. शिवाला दाखवलेला नैवेद्य आपण न खाता गायी गुरांना दिला जातो.
मंगलमय, कल्याण करणारे सदाशिव तत्त्व म्हणजे शिव. यालाच परमात्मा असेही म्हणतात. हा शिव कसा आहे? तर जन्ममरण यांचा किंवा इतर कसल्याही दु:खाचा त्याला अजिबात स्पर्श नाही. शिव हा संहारक आहे. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. विष्णू पालनपोषण करतात तर शिव संहार करतात. म्हणून माणूस मेल्यावर कैलासवासी झाला असे आपण म्हणतात. शिवाचे वास्तव्य कैलासावर असल्याने तिथे जीव शिवाची भेट होते.
आशुतोष म्हणजे लवकर संतुष्ट पावणारा. हे शिवाचे नाव आहे. त्याचे तप केले म्हणून दानवांनाही तो प्रसन्न झाला व त्यांना वर देऊन टाकला अशा कथा पुराणात आहेत. तो जर दैत्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊ शकतो, तर आपल्या भक्तीने का नाही? फक्त आपला भाव शुद्ध असायला हवा. म्हणून तर अनेक भक्त शिवपूजेला प्राधान्य देतात व शिवकृपा प्राप्त करतात. यासाठीच आपणही श्रावण मासात शिवपूजा करून भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त करूया.