सध्या श्रावण मास सुरु आहे, त्यानिमित्ताने महादेवाच्या मंदिरात जाऊन त्याची पूजा करावी व त्यावेळेस पहिले नंदी महाराजांचेही आवर्जून दर्शन घ्यावे. नंदी हे भगवान भोलेनाथांचे वाहन मानले जाते. नंदीला भगवान शिवाचा द्वारपाल देखील म्हटले जाते. असे मानले जाते की महादेवापर्यंत पोहोचण्याआधी नंदीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. कारण नंदीला भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. ते नेहमी महादेवाच्या सेवेत तत्पर असतात. ते बसलेल्या अवस्थेतही एक पाय पुढे ठेवून बसतात. याचाच अर्थ भगवान महादेवाचे बोलावणे येताच क्षणाचाही विलंब न होता त्वरित उठून सेवेत रत होता यावे अशीच त्यांची बैठक असते. अशा या नंदी महाराजांनी महादेवाचे वाहन होण्याचा मान कसा मिळवला ते जाणून घेऊ.
पौराणिक कथा :
देव आणि दानवांमध्ये जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा सर्वांनी रत्न, माणिक, मोती, अस्त्र मिळवण्यासाठी पुढाकार घेतला परंतु जेव्हा त्यातून हलाहल बाहेर आले, ते विष भगवान शंकरांनी प्राशन केले. त्यावेळेस विषाचे काही थेंब जमिनीवर सांडले. त्यावेळेस नंदीने आपल्या स्वामींप्रमाणे मागचा पुढचा विचार न करता विश्वकल्याणासाठी ते विषाचे थेंब चाटून पोटात घेतले. तो दाह सहन केला. हे भगवान महादेवाला कळले तेव्हा त्यांनी नंदीच्या पाठीवरून हात फिरवत तो दाह शांत केला आणि त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला प्रिय भक्त अशी उपाधी दिली.
नंदीची वाहन म्हणून निवड :
नंदीचा स्वभाव भोळा. सांगितलेले प्रत्येक काम निमूटपणे करणारा. शिवाय त्याच्याकडे असलेली अपार शक्ती याचा सदुपयोग करण्यासाठी महादेवांनी त्याची वाहन म्हणून निवड केली व सदा सर्वदा आपल्या सन्निध ठेवले. शिव शंकरांची अपार शक्ती वाहून नेण्याचे सामर्थ्य त्याच्यात असल्यामुळे भगवान शंकर जिथे जातात तिथे नंदीला सोबत नेतात. म्हणून प्रत्येक शिवालयाच्या गाभाऱ्यात शिवलिंग व बाहेर नंदी महाराजांची मूर्ती दिसते.
नंदीच्या कानात सांगितल्याने इच्छापूर्ती होते?
अनेक भाविक आपल्या इच्छापूर्तीसाठी नंदी महाराजांच्या कानात आपली इच्छा प्रगट करतात व ती महादेवाकडून पूर्ण करून घ्यावी अशी प्रार्थना करतात. हा केवळ भक्तांचा भोळा भाव आहे. मानवाला वाटते, जसे मोठ्या माणसाकडून काम करवून घ्यायचे असेल तर त्याच्या जवळच्या सहकाऱ्याची मर्जी संपादन करावी लागते, त्याप्रमाणे देवाच्या दरबारातही नंदी महाराजांकडे वर्णी लावली तर आपली इच्छा पूर्ण होईल. परंतु याला कोणताही शास्त्राधार नाही. देव केवळ भावाचा भुकेला आहे. ज्याचा भाव सच्चा आहे, त्यालाच देव प्रसन्न होतो. असा भोलेनाथ जसा नंदी महाराजांना पावला, तसा आपल्यावरही करुणा करो, अशी प्रार्थना करूया.