आज श्रावणातला दूसरा सोमवार. त्यानिमित्त शिव मंदिरात पूजेला जाणार असाल तर शिव मंदिराला प्रदक्षिणा घालण्याआधी दिलेली माहिती पूर्ण वाचा.
शंकर मंदिरात गेल्यावर आपण अर्धीच प्रदक्षिणा घालतो. शिवलिंगाला जोडून जी मर्यादा आखून दिली आहे, तिला शिव निर्माल्य असे म्हणतात. ते ओलांडून जाऊ नये, असेही सांगितले जाते. शिव निर्माल्य ओलांडल्याने मानव शक्तिहीन होतो, असे म्हणतात.
पुष्पदंत नावाचा गंधर्व फुलांची चोरी करायला जाताना अजाणतेपणी शिवनिर्माल्य ओलांडून जातो. त्यामुळे त्याची अदृष्ट होण्याची शक्ती नाश पावते. शक्तिहीन बनलेला तो भगवंताचा महिमा गातो. त्याने रचलेले काव्य 'शिव महिम्न स्तोत्र' म्हणून ओळखले जाते. या स्तोत्रावर शंकर प्रसन्न होऊन त्याची शक्ती त्याला परत देतात.
शिवनिर्माल्य ही भगवान शंकरांनी मनुष्याला घालून दिलेली मर्यादा आहे. जीवाचा प्रवास हा शेवटी शिवाकडे पोहोचणारा आहे. या प्रवासात आपण आपल्याला आखून दिलेल्या नीती नियमांच्या मर्यादांचे उल्लंघन केले तर एका मर्यादेनंतर मनुष्य शक्तिहीन होणारच. याचे रूपक शिवनिर्माल्य दर्शवते.
याबाबत परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांनी तर्कसुसंगत खुलासा केला आहे. तो जाणून घेऊ. ते लिहितात, 'जे कार्य किंवा जीवन प्रभूला वाहिले जाते ते शिवनिर्माल्य समजले जाते, तशा जीवनाच्या लोकांबद्दल किंवा महान कार्याबद्दल वाटेल तसे बोलणे हे शिवनिर्माल्याचे उल्लंघन गणले जाते आणि असले पाप करणारा कितीही शक्तिशाली असला तरीही थोड्याच वेळात शक्तिहीन बनतो. म्हणून वाहिलेले वित्त, प्रभूसाठी चालत असलेले कार्य किंवा प्रभूला अर्पण केलेले जीवन यांचा आपण सतत सन्मान केला पाहिजे. अशा कर्माची किंवा मासांची जिथे अवगणना होते त्या समाजात दुष्काळ, मृत्यू, भय यांचे साम्राज्य पसरते, असे शास्त्रवचन आहे.
म्हणून शिव निर्माल्य ओलांडू नये, अर्थात देव कार्यात आड जाऊ नये.