यंदा अधिक श्रावण होता आणि पाठोपाठ निज श्रावण, तोही आता सरत आला. हा महिना महादेवाला समर्पित असल्यामुळे श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी (Shravan Somwar 2023) दान करण्याची संधी दवडू नका. दान का? तर आपली संस्कृती ही समानतेचा पुरस्कार करते. दुसरा दुःखात असताना आपण आपला आनंद साजरा करू शकत नाही. तसे करणे विकृतीचे लक्षण ठरते. म्हणून संस्कृतिची शिकवण आहे, आपली ओंजळ भरली असेल तर त्यातून सांडून वाया जाण्याआधी दुसऱ्या गरजू व्यक्तीला ते दान करा. दान करताना देणाऱ्याला माज असू नये आणि घेणाऱ्याला लाज वाटू नये, हेही लक्षात ठेवा. दान कोणाला करायचे तर गरजू व्यक्तीला आणि कोणी कोणते दान करायचे याचे मार्गदर्शन ज्योतिष शास्त्रात दिले आहे, ते जाणून घेऊ.
मेष: मेष राशीचे लोक स्वभावाने तापट असल्याने त्यांनी या दिवशी दूध, दही, तूप, ताक यथाशक्ती दान करावे.
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्याने आपल्या क्षेत्रातील प्रगतीसाठी मंदिर, मठ, वृद्धाश्रम, अनाथाश्रमाला आर्थिक स्वरूपात दान करावे.
मिथुन: ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. या लोकांनी बुद्धीतेज लाभण्यासाठी लोणी किंवा तूप दान करावे.
कर्क : कर्क राशीच्या लोकांची मनस्थिती आणि परस्थिती सुधारावी यासाठी त्यांनी अन्नदान तसेच वस्त्रदान करावे.
सिंह: या राशींचा स्वामी सूर्य असल्यामुळे त्यांनी तांब्याच्या वस्तू दान कराव्यात.
कन्या : या राशीचा अधिपती ग्रह बुध असल्याने त्यांनी शैक्षणिक वस्तूंचे दान करावे.
तूळ : यादिवशी जव शिवामूठ म्हणून वाहायचे असल्याने त्याचे तसेच तांदळाचे दान करावे.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी एखाद्या गरीब कुटुंबाला अन्न धान्य दान करावे किंवा किराणा सामानाच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करावे.
धनु: या राशीचा स्वामी ग्रह गुरु गुरु असल्यामुळे या लोकांनी लोकरीचे वस्त्र किंवा उबदार कपडे दान करावेत.
मकर: मकर राशीचे लोक शनी देवाच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांनी काळ्या रंगाच्या वस्तू तसेच वृद्धाश्रमाला आर्थिक दान करावे.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामीदेखील शनिदेव असल्याने त्यांनीही लोखंडी वस्तूचे, चपलांचे, उबदार कापडाचे दान करावे.
मीन: मीन राशीच्या लोकांनी एखाद्या जोडप्याला जेवू घालावे किंवा अन्नधान्य दान करावे.