आज या वर्षातला शेवटचा श्रावणी सोमवार. त्यानिमित्त वैदेही भावे यांच्या चकली ब्लॉग स्पॉटवरील चुरमा लाडूची सहज सोपी रेसेपी शेअर करत आहे. सायंकाळी उपास सोडताना हे लाडू नैवेद्याच्या ताटात वाढा आणि घरच्यांची वाहवा मिळवा. वाचा रेसेपी आणि फॉलो करा टिप्स.
चुरमा लाडू
साहित्य:३/४ कप बेसन१/२ कप साखर१/४ कप पाणी१/४ किलो तूप१/२ टीस्पून वेलचीपूड१ टेस्पून बेदाणे
कृती:१) बेसन एका वाडग्यात घालावे. २ टीस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन बेसनात घालावे. मिक्स करून ३-४ टेस्पून पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.२) १५ मिनिटांनी परत एकदा मळून घ्यावे. खूप घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून मळावे. (पुरी लाटता येईल इतपतच मऊ करावे)३) कढईत तूप गरम करावे. मळलेल्या बेसनाच्या पातळसर पुऱ्या लाटाव्यात. या पुऱ्या गरम तुपात तळून घ्याव्यात. आच मध्यम आणि मंद यांच्यामध्ये ठेवावी.४) पुऱ्या तळल्यावर खुसखुशीत झाल्या पाहिजेत. पुऱ्या कोमट झाल्या कि हाताने चुरून घ्याव्यात. चाळणीवर चाळून चाळणीत उरलेला जाडसर भाग लाटण्याने लाटून बारीक करावे किंवा खलबत्त्यात कुटून घ्यावे. (शॉर्टकट - मी पुऱ्या गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड केली)५) साखर आणि पाणी एकत्र करून दोन तारी पाक करावा. साखर विरघळून उकळी फुटली कि ३-४ मिनिटांनी पाकाचा एक थेंब प्लेटमध्ये टाकावा. दोन चिमटीत घेउन उघडझाप करावी. दोन तारा दिसल्या तर पाक तयार झाला असे समजावे नहितर अजून थोडावेळ उकळावे. फक्त मध्येमध्ये तार चेक करत राहावी. गरम दोनतारी पाक कुटलेल्या बेसनात घालावा. वेलचीपूड आणि बेदाणे घालावे. मिक्स करून मिश्रण आळू द्यावे.६) मिश्रण आळले कि लाडू वळावेत.
टीपा:१) लाडूचे मिश्रण आळायला लागणारा वेळ बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. पाक जर दोन तारीपेक्षा थोडा जास्त झाला तर लाडूचे मिश्रण लवकर आळेल. पाक जर दोनतारी पेक्षा कमी आटला असेल वेळ जास्त लागेल. तसेच थंड प्रदेशात मिश्रण पटकन आळते. आणि याउलट उष्ण भागात आळायला वेळ जास्त लागतो.२) पुऱ्या खूप डार्क रंग येईपर्यंत तळू नयेत. गडद रंग आल्यास लाडूसुद्धा काळपट रंगाचे होतील.३) या लाडवांची चव थोडी बुंदी लाडूसारखी लागते.४) वरील पाककृतीत बेसनाऐवजी गव्हाचे पीठ आणि थोडा रवा वापरूनसुद्धा चुरमा लाडू बनवता येतात. गव्हाची कणिक (७०%) आणि रवा (३०%).५) ६ कप बेसन आणि ४ कप साखर वापरून केलेला पाक यापासून साधारण ४५ ते ५० लाडू होतील.