>> सर्वेश फडणवीस
भारतात सर्वाधिक पूजला जाणारा देव म्हणजे महादेव. त्यांच्या लीला अगाध आहेत. वेदातील रुद्र म्हणजे पुराणातील शिव आहे. आणि याच रुद्राष्टकात तुलसीदासजी म्हणतात, 'प्रियम् शंकरम् सर्वनाथम् भजामि..' खरंतर भारतात शिव या देवतेचे असंख्य भक्त आहेत. इतर कोणत्याही देवतेपेक्षा शिव हा अधिक लोकप्रिय आहे. शिवपुराण, अग्निपुराण, यांतून याची अधिक महती कळते. श्रावणात सर्वत्र शिवाची मनोभावे पूजा केली जाते. याच श्रावण महिन्याचे औचित्य साधत आपण सध्या नागपुरातील प्राचीन महादेव मंदिराबद्दल जाणून घेतो आहे. आज नागपुरातील सर्वात प्राचीन अशा जागृतेश्वर महादेव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल जास्त अशी माहिती उपलब्ध नाही.
जागनाथ बुधवारी भागातील श्री जागृतेश्वर महादेव मंदिरातील बांधकाम म्हणजे वास्तुकलेचा सर्वोत्तम नमूना आहे. गोंड राजांच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची आख्यायिका आहे. नागपूर ग्रामदेवता असाही याचा उल्लेख केला जातो. येथील महादेवाला ' जागनाथ ' देखील म्हणतात.' बुधवारी ' या वस्तीचे नाव म्हणून या मंदिराचे ' जागनाथ बुधवारी ' असेच उल्लेख बऱ्याच ठिकाणी केला आहे. जुन्या पिढीतील लोक याचा उल्लेख ' जागोबा ' 'जागोबाचे मंदिर' असाही करीत. या मंदिरात हनुमंताची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिरातील गर्भगृहात सुंदर शिवलिंग असून येथील शिवलिंगाला रोज अभिषेक केला जातो.
श्री जागृतेश्वर महादेव मंदिर हे उत्तर नागपुरातील भारतमाता चौकाच्या जवळ हे प्राचीन मंदिर आहे. मंदिर गोंड राजाच्या काळातील असून वेळोवेळी मंदिराचा जीर्णोद्धार होत गेला आहे. परंतु आताच्या पिढीतील बहुतेक नागपूरकारांना हे मंदिर माहित नाही. येथे जागोबा महाराजाची समाधी आहे. मंदिर परिसरात श्री सिद्धिविनायक गणपती ,श्री अडीचलिंगेश्वर महादेव मंदिर, श्री काळभैरव मंदिर, श्री बटुक भैरव मंदिर, श्री उदासी मठ व इतर मंदिर आहे. ह्या मंदिर परिसराला नागपुरातील काशी असे म्हणतात. स्वयंभू आणि जुने मंदिर म्हणून श्री जागृतेश्वर मंदिराचे वेगळेपण आजही टिकून आहे. मंदिरात भरपूर जागा आहे. ग्रामदैवत म्हणून आवर्जून बघावे असेच श्री जागृतेश्वर देवस्थान ट्रस्ट महादेव मंदिर आहे.