श्रावण महिना हा महादेवाचा! विशेषतः श्रावणी सोमवारी शिव मंदिरात जाऊन महादेवाची उपासना केली जाते. पण आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी बघा, या दिवशी बारा ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळावे, म्हणून त्यांनी सहा ओळींच्या द्वादश ज्योतिर्लिंग मंत्राची निर्मिती केली. हा श्लोक सहज तोंडपाठ होण्यासारखा आहे. तो जाणून घेण्याआधी ज्योतिर्लिंगाचे महत्त्व जाणून घेऊ.
ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्योती म्हणजे प्रेरणा. ज्योती म्हणजे चेतना. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! ती एकूण बारा आहेत. त्याचे वर्णन एका श्लोकात केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांची नावे लक्षात राहत नसतील, तर हा श्लोक पाठ करून टाका. या श्लोकाच्या उच्चाराने ज्योतिर्लिंगांचे स्मरण होईल आणि पुण्यही पदरात पडेल.
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ।परल्यां वैद्यानाथंच डाकिन्यां भीमशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने।वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबक गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये।
सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महांकालेश्वर, ओंकारमांधता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढ्या नाननाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होत असते.
ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे. अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ज्योतिर्लिंगे! एकराष्ट्रीयत्त्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवांना प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यावर चर्चा पुन्हा कधी! तुर्तास ओम नम: शिवाय...!