गेल्या काही वर्षांमध्ये संकष्ट चतुर्थीचा उपास करणाऱ्या भाविकांची संख्या वाढलेली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. बुद्धीदात्या गणपती बाप्पाची आराधना आणि संकष्टी निमित्त केलेली उपासना नक्कीच लाभदायक ठरते, असा अनेक गणेश भक्तांचा आजवरचा अनुभव आहे. त्यानुसार बुधवारी २५ ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थी आहे, तेव्हा बाप्पाला मोदकाचा नव्हे तर लाडवाचा नैवेद्य दाखवा. का? ते जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.
दर महिन्यात शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात चतुर्थी येते. चतुर्थी ही तिथी बाप्पाची आवडती तिथी म्हणून ओळखली जाते. या दोन्ही तिथीच्या वेळी गणेशाची पूजा केली जाते. अथर्वशीर्षाची आवर्तने म्हटली जातात. त्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी अशी ओळख आहे. पैकी संकष्टी चतुर्थीला भाविक उपासने बरोबर उपासही करतात आणि चंद्रोदय झाला की चंद्राचे दर्शन घेऊन, बाप्पाची आरती म्हणून, नैवेद्य दाखवून मग उपास सोडतात.
चन्द्र दर्शनाचे महत्त्व काय, याची कथा तुम्हाला माहीत आहेच, तरी संकष्टी निमित्त थोडक्यात उजळणी करू. भाद्रपद चतुर्थीचा दिवस होता. घाईघाईत उंदरावरून निघालेले बाप्पा घसरून पडले आणि त्यांना पाहून चन्द्र हसू लागला. बाप्पाने रागावून त्याला शाप दिला की 'तुला तुझ्या रूपाचा एवढा अहंकार आहे ना, तू यापुढे कधीच कोणाला दिसणार नाहीस!' हे ऐकून चंद्र घाबरला आणि गयावया करू लागला. माफी मागू लागला. तेव्हा बाप्पाने त्याला अट घातली. कधीही कोणाच्या व्यंगावर हसणार नसलास तर उ:शाप देतो. असे म्हणत चंद्राला सांगितले, 'यापुढे दर चतुर्थीला तुला पाहिल्याशिवाय माझे भक्त उपास सोडणार नाहीत आणि आजच्या दिवशी म्हणजे भाद्रपद चतुर्थीला तू मला हसलास म्हणून आजच्या दिवशी तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो बघेल त्याच्यावर चोरीचा आळ येईल.' अशी ही चतुर्थी कथा. म्हणून संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन घेतात आणि भाद्रपद चतुर्थीला चंद्रदर्शन घेत नाहीत.
या नियमानुसार भाविक चंद्र दर्शन घेऊन बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. परंतु वर म्हटल्याप्रमाणे श्रावण शुक्ल चतुर्थीला मोदकांचा नाही तर लाडवांचा नैवेद्य दाखवतात. कारण श्रावण शुक्ल चतुर्थीला विनायक संकष्ट चतुर्थी असे नाव मिळाले आहे. आपण विनायकीला बाप्पाला लाडवाचा आणि संकष्टीला मोदकाचा नैवेद्य दाखवतो, मात्र श्रावणातल्या संकष्टीला विनायकी नाव मिळाल्याने यावेळी विनायक संकष्टीला लाडवांचा मोदक दाखवून बाप्पाला तृप्त करा आणि तो प्रसाद ग्रहण करून तुम्हीही तृप्त व्हा! बाप्पा मोरया!