महाराष्ट्रातील खानदेश भाग, तसेच राजस्थान-सौराष्ट्र-गुजरात येथील बNयाच जणांची राणूबाई कुलस्वामिनी आहे. या भागांमध्ये तिची मंदिरे आहेत. तिचा कुळधर्म म्हणजे एक वसा आहे. श्रावणातील पहिल्या आदित्यवारी त्याचे पालन, ती ज्यांची कुलस्वामिनी आहे, त्या घरातील स्त्रिया करतात. एकप्रकारे ही सूर्योपासना आहे.
या व्रताचा व्रतविधीश्रावणातील पहिल्या आदित्यवारी म्हणजे रविवारी काहीही न बोलता म्हणजे मौन धरून स्त्रिया अंथरुणावरून उठतात. आंघोळ वगैरे करून एक तांब्या भरून पाणी आणतात. तो जमिनीवर न टेकवता हातातच धरतात. विड्याच्या पानावर रक्तचंदनाने सूर्याची प्रतिमा काढतात. सप्तपदरी दोरा घेऊन त्याला सहा गाठी मारतात. रांगोळीने एक वर्तुळ काढतात. त्यात षटकोनी आकृती काढतात. त्यावर तो दोरा विड्याचे सूर्यप्रतिमा काढलेले पान ठेवून त्यांची सर्वजणी मिळून पूजा करतात. आलेल्या सवाष्णिंना व पुरोहितांना जेवू घालतात.
व्रतकथाएक गरीब ब्राह्मण होता. त्याला रानात हे व्रत समजले. त्याने ते केले. त्यामुळे त्याच्या घरात धन दौलत आली. पुढे त्याच्या मुलींची लग्ने राजकुमारांशी झाली. कुळधर्म व कुळाचार पाळणाऱ्यांची भरभराट कशी होते, हे सांगणारी ही कथा आहे. खानदेशात राणूबाईला रणादेवी म्हणतात. ती ज्यांची कुलदेवता आहे, त्यांच्याकडे हे व्रत केल्याने मंगलकार्य ठरते. ते होण्यापूर्वी घरात सूर्य व रणादेवी यांचा विवाह लावण्यात येतो. हा विवाह तुलसी विवाहासारखाच असतो.
सूर्योपासनेचे महत्त्व अधोरेखित करणारे हे व्रत आहे. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो त्यामुळे सूर्यदर्शन कधीतरी घडते. अशात कोवळी उन्हे अंगावर घेण्याचा आनंद लुटता यावा आणि सकाळच्यावेळी निसर्गसौंदर्य न्याहाळावे, त्यासाठीदेखील सूर्यपूजेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सोमवार ते शनिवार जसा कोणत्या ना कोणत्या देवतेमुळे महत्त्वाचा झाला, तसा रविवार आदित्य राणुबाईच्या व्रतामुळे पावन झाला आहे. राणुबाई आपली कुलस्वामिनी नसली, तरीदेखील ते देवीचेच रूप असल्याने आपणही मनोभावे पूजा केली, तर काय सांगाव, देवी प्रसन्न होऊन आपल्या घरीही मंगलकार्याचे योग जुळून येऊ शकतील...!