श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यावर दुसऱ्या दिवशी अर्थात श्रावण शुक्ल द्वादशीला पारणे केले जाते. यासाठी देखील एक व्रत धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्याचे नाव आहे दधिव्रत. दधि अर्थात दही. हे देखील कृष्ण पूजेचे व्रत आहे. या व्रतात कृष्णाची श्रीधर नावाने पूजा करून त्याला दह्याने अभिषेक घातला जातो. नंतर कोमट पाण्याने मूर्ती स्वच्छ करून त्यावर गंध, अक्षता, फुले वाहिली जातात व कृष्णाला दही साखरेचा नैवेद्य दाखवला जातो.
ज्यांनी एकादशीचा दोन्ही वेळेचा उपास केला आहे त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी केवळ दही भात खाऊन राहणे अवघड जाईल. त्यामुळे एकादशीचा उपास सोडताना दहीभाताचा जेवणात समावेश करावा. कृष्णाला तुळशी वाहून व्रत पूर्ण करावे.
दधिव्रत पंचमहापाप नाश व्रत म्हणूनही केले जाते. या वृत्तानुसार कृष्णाच्या बारा नावांनी पूजा करावी व श्रावण अमावस्येला भात, तीळ, गूळ, मूग अशा साहित्यांचा समावेश असलेला स्वयंपाक करून तो गरजू व्यक्तीला दान करावा असा व्रत विधी आहे. तसे केल्यामुळे पापनाश होतो अशी श्रद्धा आहे.
सद्यस्थितीत या व्रतांबद्दल कोणाला फारशी माहिती नसते. तसेच अशी व्रते करण्याबद्दल फार उत्सुकताही नसते. मात्र या व्रतांचा हेतू जाणून घेत हेतुपुरस्सर ही व्रते केली, तर त्यानिमित्ताने दान धर्म घडेल, सात्विक अन्न शरीरी लागेल, दुसऱ्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतल्याचे समाधान निश्चित मिळेल.