श्रावणातील इतर दिवसांप्रमाणे शनिवारचे महात्म्यही खास आहे. आपण दर शनिवारी शनि व मारुतीची पूजा करतोच. परंतु श्रावणी शनिवारी विशिष्ट हेतूने शनिपूजा केली जाते. तो हेतू म्हणजे साडेसातीचा त्रास कमी होणे. सध्या धनू, मकर व कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. त्यांनी तसेच इतर भाविकांनीदेखील शनिदेवांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून हे व्रत करावे.
प्रथम शनिच्या लोखंडाच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालावे. मग तिची श्रद्धापूर्वक पूजा करावी. 'कोणस्थ', `पिंगल', 'बभ्रु' आदि शनिच्या नावांचा अथवा ही नावे असलेल्या शनि स्तोत्रातील पहिल्या श्लोकाचा जप करावा. तो श्लोक पुढीलप्रमाणे-
कोणोऽन्तको रौद्रयमोऽथ बभ्रु: कृष्ण: शनि: पिंगलमन्दसौरि:नित्य स्मृतो यो हरते चपीडां तस्मै नम: श्रीरविनन्दनाय।।
अशी पूजा करून झाल्यावर खीर, पुऱ्या आणि तांदूळ उडीद डाळ यांची खिचडी असा नैवेद्य दाखवावा. या व्रताने शनिपीडा कमी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. यातील पूजा, नैवेद्यादी विशी करणे ज्यांना शक्य नाही, त्यांनी मारुतीला रुईची माळ, दोन चार काळ्या उडदासह तेल वाहीले तरी चालू शकते.
हे व्रत करताना चार शनिवार चार प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. पहिल्या शनिवारी उडदाचा भात आणि दही, दुसऱ्या शनिवारी केवळ खीर, तिसऱ्या शनिवारी पेढे, बर्फी आणि चौथ्या शनिवारी पुऱ्या किंवा एखाद्या तळणीच्या पदार्थाचा समावेश असावा. विशेष म्हणजे हा नैवेद्य देवाला दाखवून झाल्यावर एखाद्या गरजवंताला द्यावा. असे मिष्टान्न मिळाल्यावर तो आनंदून जाईल व त्याने दिलेल्या शुभेच्छारूपी आशीर्वादातून शनिदेवांची कृपाही लाभेल. या व्रतात पूजे अर्चेइतरकेच दानालाही महत्त्व आहे. काळ्या रंगाचे वस्त्र, चपलांचे जोड, छत्री किंवा उपयोगी कोणतेही सामान गरजवंताला दान कराव़े जेणेकरून आपल्या हातांना केवळ घेण्याची नाही तर दान करण्याचीही सवय लागेल. कारण हेच शनि महाराजांनादेखील अभिप्रेत आहे.