भारतात प्रामुख्याने बंगाली स्त्रियांमध्ये हे व्रत करण्याची प्रथा आहे. आपली मुले दीर्घायुषी व्हावीत यासाठी माता भगिनी श्रद्धेने श्रावण शुक्ल षष्ठीला षष्ठीदेवीची जिला आप 'सटवाई' म्हणतो, तिला तिथे षष्ठीदेवी मानतात. लोटण म्हणजे लाडू, पूजा करून तिला लाडवांचा नैवेद्य दाखवतात. उद्या म्हणजे १३ ऑगस्ट रोजी श्रावण षष्ठीला हे व्रत करता येईल.
या व्रतासंबंधात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी धर्मबोध ग्रंथात अधिक माहिती दिली आहे - आपल्या मुलांच्या विशेषत: नवजात अर्भकांच्या दीर्घायुष्यासाठी सटवाईला प्रसन्न करण्यासाठी ही एक रूढी आहे. खाऊ घालून प्रसन्न केले तर आपली मुले निर्धोकपणे मोठी होतील, नाचतील, बागडतील या भावनेने हे व्रत सुरू करण्याची प्रथा सुरू झाली.
उत्सव आणि स्त्रियांचे नाते जवळचे असते. कारण प्रत्येक गोष्ट त्या अतिशय भावुकतेने करतात. सण वाराच्या निमित्ताने त्यांना रोजच्या व्याप तापातून थोडा विरंगुळा मिळतो. त्यातही प्रश्न जेव्हा सौभाग्याचा आणि मुलाबाळांच्या उन्नतीचा येतो, तेव्हा त्या स्वत:चे सुख दु:खं बाजूला ठेवून कुटुंबियांसाठी सर्वकाही करण्यास सिद्ध होतात. त्याचीच प्रचिती देणारे हे व्रत आहे. यात व्रतकर्ती स्त्री असूनही ती स्वत:साठी काही न मागता आपल्या मुलांचे सुख देवीकडे मागते.
पूर्वी विज्ञानाबद्दल अनभिज्ञता होती. त्यामुळे कुपोषण, लहा मुलांना होणारे प्राणघातक रोग, मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे याबद्दल बरेच अज्ञान होते. सारे काही देव आणि दैवावर सोडून दिले जाई. त्यातूनच लोटणषष्ठीसारखी व्रते अस्तित्वात आली. त्यांना अंधश्रद्धा म्हणून नाक मुरडण्यापेक्षा त्यामागील मातृहृदयाची, अपत्यप्रेमाची विशालता, मुलांबद्दलचा वात्सल्यभाव या भावभावनांचा शोध घेण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांसाठी त्यांच्या सुखासाठी, दीर्घायुष्यासाठी आई काय करू शकते याबद्दलची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी लोटणषष्ठी हे असेच एक गोड उदाहरण आहे असे म्हणता येईल.